– जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष शिबिराचे आयोजन ; DEIC आणि RBSKचा संयुक्त पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : बालकांना वेळेत निदान व उपचार मिळावेत, या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित विशेष शस्त्रक्रिया शिबिरात नऊ बालकांवर ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (RBSK) आश्रमशाळा तपासणी पथकाच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शाळा व आश्रमशाळांमध्ये आयोजित आरोग्य तपासणीदरम्यान काही बालकांमध्ये ‘टंग टाय’ची समस्या आढळून आली होती. या बालकांना संदर्भसेवेच्या माध्यमातून पुढील तपासणी, निदान आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यासाठी हे विशेष शिबिर घेण्यात आले. या शिबिरात नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. आयुषी गुप्ता यांनी नऊ बालकांवर शस्त्रक्रिया केल्या.
दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी शस्त्रक्रिया कक्षाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिराच्या यशस्वितेसाठी शस्त्रक्रिया कक्षाचे प्रभारी व कर्मचारी, तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. आरोग्य तपासणीत आढळलेल्या बालकांना वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व प्राप्त झाले आहे.













