दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! १०वी-१२वी परीक्षा शुल्क माफ
The गडविश्व
मुंबई, दि. ३० : राज्यातील दुष्काळग्रस्त २६५ तालुक्यांतील इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी या तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे भरून घेण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व विभागीय मंडळांना दिल्या आहेत.
मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचाही समावेश आहे.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षांसाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांकडून शुल्क न घेता ऑनलाइन आवेदनपत्रे स्वीकारण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, याबाबतच्या सविस्तर सूचना राज्य मंडळाकडून स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहेत. सर्व विभागीय मंडळांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना तातडीने सूचना देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तसेच करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळाकडे सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dushkal













