Gadchiroli : २४ बालकांवर दंत लघुशस्त्रक्रिया यशस्वी; DEIC मध्ये मिळाली वेळेवर उपचाराची सुविधा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यातील बालकांच्या दंत आरोग्यासाठी राबविण्यात येत असलेल्या सेवेला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) येथे ० ते १८ वर्षे वयोगटातील २४ बालकांवर विविध दंत आरोग्य समस्यांवरील लघुशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत जिल्ह्यातील शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. या तपासणीदरम्यान दातांच्या समस्या आढळलेल्या बालकांना पुढील तपासणी व उपचारासाठी DEIC येथे संदर्भित केले जाते.
DEICमध्ये संदर्भित बालकांची तज्ज्ञांकडून सविस्तर तपासणी करून समस्येचे निदान केले जाते. त्यानुसार औषधोपचार, पुढील उपचार किंवा आवश्यकतेनुसार लघुशस्त्रक्रियेचे नियोजन केले जाते. याच प्रक्रियेत सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून २४ बालकांवरील विविध दंत लघुशस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या.
गडचिरोलीतच मिळतेय उपचाराची सुविधा
जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील DEIC हे गडचिरोली जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांसाठी द्वितीयस्तरीय संदर्भसेवा केंद्र म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे दंत आरोग्याच्या समस्यांसाठी गरजू बालकांना जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज कमी होत असून, गडचिरोलीतच आवश्यक तपासणी, संदर्भसेवा आणि उपचाराची सुविधा उपलब्ध होत आहे.
RBSK आणि DEICच्या माध्यमातून बालकांच्या आरोग्य समस्यांचे वेळेवर निदान करून आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. सेवा संकल्प अभियानामुळे या सेवेला अधिक गती मिळाली असून, गरजू बालकांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होत आहे.













