धानोरा येथे एआय तंत्रज्ञानावर आधारित फिरत्या रोगनिदान केंद्राचा शुभारंभ
– ‘आरोग्य सेवा आपली दारी’ उपक्रमातून दुर्गम भागातील नागरिकांना मिळणार अत्याधुनिक आरोग्य सुविधा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २६ : दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा त्यांच्या गावातच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘आरोग्य सेवा आपली दारी’ उपक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानावर आधारित फिरत्या रोगनिदान केंद्राचा शुभारंभ धानोरा येथे करण्यात आला.
या आधुनिक सुविधांनी सुसज्ज वाहनातून नागरिकांना विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून घेता येणार आहेत. यामध्ये क्ष-किरण तपासणी, स्तन, मुख व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी, नेत्र तपासणी, विविध रक्तचाचण्या, मातृ व बाल आरोग्य तपासणी तसेच हृदयविकार आणि मधुमेहासंबंधी तपासण्यांचा समावेश आहे. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने रोगांचे निदान अधिक सुलभ आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.
हे फिरते रोगनिदान केंद्र गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये फिरून आरोग्य सेवा देणार आहे. या वाहनासोबत दोन अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि क्ष-किरण तंत्रज्ञ असे प्रशिक्षित पथक कार्यरत राहणार आहे. सदर केंद्र धानोरा येथे तीन दिवस मुक्कामी राहणार असून, परिसरातील नागरिकांनी उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य सदस्याजी साळवे, भूमाला विजयके, संजय कुंड, अनिल मशाखेत्री, विनोद लेनगुरे, शेवंता हलामी, गजानन परके, अधीक्षक डॉ. बागराज धुर्वे, डॉ. सीमा गेडाम यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.













