आरमोरीत अवैध दारूचा मोठा साठा उद्ध्वस्त ; 15.65 लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच आरोपी अटकेत
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 15 लाख 65 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार अवैध दारू व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान 10 जून रोजी आरमोरी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सुनिल रामचंद्र जिभकाटे (रा. शेगाव टोली, आरमोरी) हा साथीदारांच्या मदतीने बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू आणून आरमोरी येथील बीएसएनएल टॉवरजवळील गोदामात साठवून ठेवत असल्याची माहिती मिळाली होती.
माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. यावेळी काही व्यक्ती एका चारचाकी वाहनातून मद्याचे बॉक्स गोदामात उतरवत असल्याचे दिसून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पसार झाले. मात्र गोदामात उपस्थित असलेल्या सुनिल जिभकाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या तपासणीत गोदाम व वाहनातून विविध ब्रँडच्या देशी-विदेशी मद्याच्या हजारो बाटल्या, बिअरचे शेकडो टिन, हातभट्टी मोहाची दारू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण 15.65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये रॉयल स्टॅग व्हिस्की, रॉयल चॅलेंज, किंगफिशर, लंडन पिल्सनर बिअर, टायगर ब्रँड संत्री, रॉकेट देशी दारू तसेच 60 लिटर हातभट्टी मोहाची दारू यांचा समावेश आहे. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी कारही जप्त करण्यात आली.
या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सुनिल जिभकाटे, अजय दादाजी राऊत (अंतरजी), राहुल राऊत, अजय राऊत (दोघेही रामाळा) आणि सुभाष तुलावी (दंवडी, ता. धानोरा) यांचा समावेश आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, गोकुल राज जी., हर्षवर्धन बी.जे. तसेच सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कैलास गवते, पोउपनि. संतोष कडाळे, नरेश सहारे व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोउपनि. संतोष कडाळे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews














