कुरखेडा : खड्डे बुजवले की मृत्यूचा सापळा तयार केला? चिचटोला फाट्यानजीकचा उंचवटा ठरतोय अपघातांचे केंद्र
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०४ : रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कुरखेडा-गेवर्धा मार्गावरील चिचटोला फाट्यानजीकचा रस्ता आता वाहनचालकांसाठी धोक्याचा ठरला आहे. पुलाजवळ सिमेंट काँक्रिट टाकून खड्डे बुजविण्यात आले असले तरी रस्त्याची पातळी न तपासता करण्यात आलेल्या या कामामुळे मोठा उंचवटा तयार झाला असून तो अपघातांना खुले आमंत्रण देत आहे.
चिचटोला फाट्यानजीकच्या ढाब्याजवळ असलेल्या छोट्या पुलानंतर काही दिवसांपूर्वी खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. मात्र हे काम इतक्या निष्काळजीपणे करण्यात आले की, रस्ता समतल होण्याऐवजी आणखी धोकादायक बनला आहे. सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या पातळीपेक्षा वर आल्याने वाहनांना अचानक धक्का बसत असून दुचाकीस्वारांचा तोल जाण्याचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे, हा उंचवटा टाळण्यासाठी अनेक वाहनचालकांना आपल्या लेनमधून बाहेर पडून विरुद्ध दिशेने वाहन चालवावे लागत आहे. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी समोरासमोर धडक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच संबंधित विभाग जागा होणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खड्डे बुजविण्याचे काम झाले म्हणून प्रशासन पाठ थोपटून घेत असले तरी प्रत्यक्षात या कामाने वाहनधारकांची डोकेदुखी वाढवली आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा परिसर भविष्यात ‘अपघातप्रवण क्षेत्र’ म्हणून ओळखला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तातडीने उंचवटा समतल करून रस्ता सुरक्षित करावा, अन्यथा होणाऱ्या अपघातांची जबाबदारी संबंधित विभागावरच राहील, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #kurkhedanews #accident














