गडचिरोली : पोलीस भरती प्रक्रिया सुरू असतानाच जहाल नक्षली दांपत्याचे गृहमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण

1191

– ४१ लाखांचे बक्षीस होते जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे या दरम्यान जहाल माओवादी, डिकेएसझेडसीएम, गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, सब मिलिटरी कमिशनचा सदस्य, वेस्टर्न सब-झोनल कमांडर इन चिफ तसेच कंपनी नं. १० चा इन्चार्ज गिरीधर तुमरेटी (वय ४४) आणि त्यांची पत्नी ललीता ( वय ३९) (डिव्हीसी भामरागड दलम) या दांपत्याने गडचिरोली येथे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर शनिवार २२ जून २०२४ रोजी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर शासनातर्फे ४१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान आत्मसमर्पित माओवादी यांच्या मेळाव्यात उपस्थित राहून माओवादी कुटूंबातील सदस्यांसोबत त्यांनी संवाद साधला. त्यानंतर सिटीसी किटाळी येथील कॉन्फरन्स हॉल व महिला पोलीस अंमलदार बॅरेक उद्घाटन समारंभ व माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) व सी-60 जवानांचा सत्कारही करण्यात आला.
विशेष म्हणजे १३ नोव्हेंबर २०२१ रोजी मर्दीनटोला चकमकीनंतर माओवाद्यांची मोठ्या प्रमाणात जिवित हाणी झाल्यामुळे उत्तर आणि दक्षिण विभागाचे विलीनीकरण होऊन संपूर्ण गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळीची जबाबदारी गिरीधरकडे सोपविण्यात आली होती. त्यामुळे गिरीधरच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली आणि संपूर्ण मध्य भारतातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला आहे.
आत्मसमर्पित माओवादी यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री यांनी कतरंगट्टा व मुद्दुमुडगू जंगल परिसरात झालेल्या दोन चकमकीमध्ये ०३ डिव्हिसीएम माओवाद्यांसह एकुण ०७ कट्टर माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश प्राप्त करुन माओवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देवुन सत्कार केला. यासोबतच कतरंगट्टा चकमकीचे नेतृत्व करणारे अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, भा.पो.से. यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या महिला माओवादी रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी हिला उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ४.५० लाख रुपयाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आत्मसमर्पित कुटूंबातील गडचिरोली येथे उच्च शिक्षण घेणा­या मुलीला टॅब तसेच माओवाद्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सायकल, स्प्रेपंप व शिलाईल मशिनचे वाटप करुन आत्मसमर्पित माओवाद्यांच्या कुटुंबीयांशी उपमुख्यमंत्री यांनी संवाद साधला व त्यानंतर गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2024 चा आढावा घेतला आणि गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येणा­या माओवादविरोधी अभियान कार्याचे तसेच नागरीकृती उपक्रमाद्वारे जिल्ह्रातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवाच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या कामाबद्दल कौतुक करत माओवाद्यांनी हिंसेचा त्याग करुन आपली शस्त्रे खाली ठेवून सन्मानाचे जिवन जगण्यासाठी लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामिल होत शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन केले. यावेळी जहाल माओवादी दांपत्याने आत्मसमर्पणही केले.
या विविध कार्यक्रमांसाठी अशोक नेते माजी खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ, देवराव होळी आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, कृष्णा गजबे आमदार आरमोरी विधानसभा मतदार संघ, अंकित गोयल पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, संजय दैने जिल्हाधिकारी गडचिरोली, नीलोत्पल पोलीस अधीक्षक गडचिरोली, कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन), यतिश देशमुख अपर पोलीस अधीक्षक (अभियान), एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक, अहेरी (प्राणहिता) हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस मुख्यालय, गडचिरोली तसेच सर्व शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

आत्मसमर्पीत जहाल माओवादीचा कार्यकाळ

– नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चु

हा ०९ जुलै १९९६ मध्ये एटापल्ली दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला. डिसेंबर १९९७ मध्ये एटापल्ली दलममध्ये पार्टी मेंबर म्हणून बढती.
जानेवारी १९९८ मध्ये सिसिएम सोनू याचा अंगरक्षक म्हणून काम.
नोव्हेंबर २००१ मध्ये सिसिएम सोनूचा गार्ड असतांना एसीएम (एरिया कमिटी मेंबर) या पदावर बढती.
सप्टेंबर २००२ मध्ये बदली होऊन भामरागड दलममध्ये कमांडर म्हणून काम केले.
ऑक्टोंबर २००६ मध्ये डीव्हीसीएम पदावर बढती व त्यानंतर बदली होऊन कंपनी नं. ०४ मध्ये उप-कमांडर म्हणून काम.
फेब्रुवारी २००९ मध्ये कंपनी नं ०४ मध्ये कमांडर.
मार्च २०१३ मध्ये डीव्हीसिएस/सीवायसीपीएस (कंपनी पार्टी कमिटी सचिव) पद.
नोव्हेंबर २०१५ मध्ये डीकेएसझेडसी सदस्य (दंडकारण्य स्पेशन झोनल कमिटी सदस्य) पदावर बढती व यासोबतच एसएमसी (सब मिलिटरी कमिशन मेंबर) व वेस्टर्न सबझोनल कमांडर इन चिफ म्हणून काम केले.
कंपनी नं. १० चा प्रभारी म्हणून काम.
ऑक्टोंबर २०२० मध्ये दक्षिण गडचिरोली डिव्हीजन सचीव पदावर काम.
२०२१ मर्दीनटोला अभियान आणि उत्तर व दक्षिण गडचिरोली विभागाच्या विलीनीकरणानंतर त्याने विभागीय समितीचे प्रभारी व सचिव म्हणून काम केले.
गडचिरोली जिल्ह्यातील सिपीआय माओवाद्यांच्या संपूर्ण राजकिय व लष्कर हालचालींचा प्रभारी म्हणून त्याने काम केले.
त्याचेवर आजपर्यंत एकुण १७९ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ८६ चकमक, १५ जाळपोळ इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.

– संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडीे

ही २००६ मध्ये कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०११ पर्यंत कार्यरत होती
२०११ मध्ये कसनसूर दलममधून मैनपूर (छ.ग.) येथे बदली.
२०११ ते २०२० मध्ये माड एरीया मध्ये कार्यरत.
जून २०१० मध्ये माड एरीया मधून दक्षिण गडचिरोली एरीयामध्ये बदली होऊन भामरागड दलममध्ये डिव्हीसीएम पदावर आजपावेतो कार्यरत.
तिच्यावर आजपर्यंत एकुण १८ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०७ चकमक, ०१ जाळपोळ, इ. गुन्ह्रांचा समावेश आहे.

महाराष्ट्र शासनाने नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चु याचेवर २५ लाख रूपयाचे तर संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडी हीचेवर १६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्चु याला एकुण १५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. तर संगिता ऊर्फ ललीता चैतु उसेंडी हिला एकुण ८.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता राज्य शासनाकडुन पती पत्नी असलेले नक्षल सदस्य यांनी आत्मसमर्पण केल्यास एकत्रित अतिरिक्त मदत म्हणून १.५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #naxalsurrender )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here