मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मौशीखांब ग्रामपंचायतीची पाहणी

36

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मौशीखांब ग्रामपंचायतीची पाहणी
– विविध विकासकामांचे समितीकडून कौतुक, गावपातळीवरील योजनांच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १४ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध विकासकामांची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती राळेगावच्या समितीने सोमवार, ११ मे २०२६ रोजी गट ग्रामपंचायत मौशीखांब येथे भेट दिली. यावेळी अभियानांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांसह ग्रामपंचायतीच्या दप्तरांची सखोल तपासणी करण्यात आली.
पाहणी समितीत गटविकास अधिकारी पवार, शाखा अभियंता मुळे, विस्तार अधिकारी पंचायत म्हस्के, विस्तार अधिकारी पंचायत पोपडकर, ग्रामपंचायत अधिकारी भोयर व अमृतकर यांचा समावेश होता. तसेच गडचिरोली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पंचायत देव्हारे, ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर, ग्रामपंचायत अधिकारी निकुरे उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत मौशीखांबच्या प्रशासक सौ. रंजिता डंबाजी पेंदाम, ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे, प्रशासकीय समिती सदस्य सौ. रुपाली गांधरवार, विकास उंदिरवाडे, जयकुमार खेडेकर, सौ. वर्षा तिवाडे, सौ. अंजना कुमरे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष गणेश दहलकर, उपाध्यक्ष लोभाजी हर्षे, संतोष चौधरी (पो.पा. रानखेडा), वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष पांडुरंग समर्थ यांच्यासह अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग कर्मचारी, उमेद अभियानातील आयसीआरपी, महिला बचत गट सदस्य, पेसा मोबिलायझर, मौशीखांब जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आवारी सर तसेच मौशीखांब, बेलगाव, रानखेडा व मोहटोला येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समितीने सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ-हरित गाव, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ उभारणी तसेच नाविन्यपूर्ण उपक्रमांचा आढावा घेतला.
पाहणीदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, सार्वजनिक शौचालय, घनकचरा व्यवस्थापन शेड, आरोग्य उपकेंद्र, अभ्यासिका, पशुवैद्यकीय दवाखाना, धार्मिक स्थळे आणि खुली व्यायामशाळा आदी ठिकाणी भेट देऊन कामकाजाची तपासणी करण्यात आली.
ग्रामपंचायत अंतर्गत गावांमध्ये विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. विकासकामे समाधानकारक व उल्लेखनीय असल्याचे सांगत समितीने ग्रामपंचायतीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या पाहणीदरम्यान ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर ठाकरे, सुरेश कोलते, हेमंत मोंगरकर आणि प्रतिभा अलाम यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here