अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्स : QR कोडद्वारे नोंदणीचे आवाहन

54

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्स : QR कोडद्वारे नोंदणीचे आवाहन
– १८ मेपासून गडचिरोलीत प्रशिक्षण
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) पूर्वतयारीसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण उपक्रम १८ मे २०२६ पासून गडचिरोली येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू होणार असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आदिवासी युवक-युवतींसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
या निवासी प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना महा-टीईटी परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सखोल मार्गदर्शन, गुणवत्तापूर्ण अध्यापन, परीक्षाभिमुख तयारी तसेच आवश्यक निवासी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये सक्षम करण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील तसेच जून २०२६ मध्ये होणाऱ्या महा-टीईटी परीक्षेसाठी अर्ज अथवा नोंदणी केलेले इच्छुक उमेदवार पात्र राहणार आहेत. अर्ज करताना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती, सामाजिक व जातविषयक तपशील, शैक्षणिक पात्रता, नोकरीसंबंधित माहिती (असल्यास) तसेच महा-टीईटी परीक्षेशी संबंधित माहिती सादर करणे आवश्यक आहे.
अर्जासोबत आधार कार्डची प्रत आणि जून २०२६ महा-टीईटी अर्ज अथवा नोंदणी पावती जोडणे बंधनकारक आहे. इच्छुकांनी प्रसिद्ध करण्यात आलेला QR कोड स्कॅन करून ऑनलाइन नोंदणी करावी किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी atc.ngp-mh@mah.gov.in या ई-मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील पात्र व इच्छुक आदिवासी युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here