– आपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायत व ‘क’ वर्ग नगर परिषद क्षेत्रात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) त्वरित व प्रभावीपणे राबविण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी, उपाध्यक्ष राजू मडावी, सचिव अमृत मेहेर, संगठन मंत्री चेतन गहाणे आणि युवा संघटक साहिल बोदेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे पाटील यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात शासन निर्णय (३ मार्च २०१४ आणि १८ नोव्हेंबर २०२१) नुसार नगर पंचायतींमध्ये MGNREGA ची काटेकोर अंमलबजावणी करावी, अकुशल मजुरांना १०० दिवसांचा रोजगार द्यावा, जॉब कार्ड नोंदणी तात्काळ पूर्ण करावी तसेच शेततळे, विहिरी, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पाणदण रस्त्यांची दुरुस्ती यास प्राधान्य द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. याशिवाय कामांच्या पारदर्शकतेसाठी सामाजिक अंकेक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्याचीही सूचना करण्यात आली.
गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल जिल्ह्यात बहुतांश लोकसंख्या शेती व मजुरीवर अवलंबून आहे. रोजगार हमी योजना न राबवल्याने मजुरांना स्थलांतर करावे लागत असून, शेती विकास थांबला आहे. शासन निर्णयानुसार अकुशल कामांचा १००% आणि साहित्य खर्चाचा ७५% निधी राज्य शासनाकडून उपलब्ध होतो; तरीही स्थानिक प्रशासनाने ठोस कार्यवाही केली नसल्याची खंत निवेदनात व्यक्त करण्यात आली.
जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी स्मिता बेलपात्रे पाटील यांनी सर्व नगर पंचायतींना MGNREGA अंमलबजावणीसाठी तात्काळ सूचना देण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा अध्यक्ष नसीर हाशमी म्हणाले, “MGNREGA ची प्रभावी अंमलबजावणी गडचिरोलीच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यावश्यक आहे. यामुळे मजुरांना रोजगार आणि शेतकऱ्यांना शेती विकासाचे लाभ मिळतील.” तर राजू मडावी यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर नियंत्रणासाठी शेतीसंबंधी सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले.
आपच्या या निवेदनामुळे आणि प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे गडचिरोलीत रोजगार निर्मिती व शेती विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













