पोलिस पाटलांच्या मानधन स्लिप आणि रिक्त पदांची तातडीने पूर्तता करा

96

– गडचिरोलीत जिल्हाधिकारी यांना निवेदन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ११ : गाव कामगार पोलिस पाटील संघटना, महाराष्ट्र राज्य – गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्यातील पोलिस पाटलांच्या दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगराज नाकाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल आणि निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांना सादर करण्यात आले.
जिल्ह्यात पोलिस पाटलांची मंजूर पदसंख्या १,५१४ असून त्यापैकी फक्त ८०० पाटील कार्यरत आहेत. तब्बल ५० टक्के पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणले. विशेषतः चामोर्शी तालुक्यात दोन वेळा भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही नियुक्ती आदेश प्रलंबित असून ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच पोलिस पाटलांना सॅलरी स्लिपप्रमाणे मानधन स्लिप देण्याची मागणीही संघटनेने केली आहे. अशी सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीच उपलब्ध असून, गडचिरोलीत लागू केल्यास पाटलांना बँक कर्ज, हप्त्यांवर खरेदी आणि आर्थिक व्यवहारात पारदर्शकता राखता येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष योगराज नाकाडे म्हणाले, “पोलिस पाटील हे गावाच्या कायदा-सुव्यवस्थेचे कणा आहेत. रिक्त पदांमुळे प्रशासनावर ताण वाढला आहे. मानधन स्लिप मिळाल्यास पाटलांची आर्थिक स्थिरता वाढेल.”
या वेळी जिल्हा सचिव मुरारी दहीकर, कोषाध्यक्ष पंडित मेश्राम, तालुका अध्यक्ष कुणाल उसेंडी, विश्वनाथ रामटेके, तालुका सचिव मुकुंद तुमराम (कुरखेडा) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रशासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच आवश्यक ती पावले उचलली जातील अशी अपेक्षा आहे. ग्रामीण सुरक्षेला बळकटी देण्यासाठी आणि पोलिस पाटलांचा सन्मान राखण्यासाठी या मागण्यांची तातडीने पूर्तता व्हावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here