अवैधरित्या ५१ गोवंशाची तस्करी; चौघांच्या आवळल्या मुसक्या, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त

66

अवैधरित्या ५१ गोवंशाची तस्करी; चौघांच्या आवळल्या मुसक्या, ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
– क्रूर वाहतुकीत ४ जनावरांचा गुदमरून मृत्यू
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १८ : कत्तलीच्या उद्देशाने ५१ गोवंशाची दाटीवाटीने आणि क्रूर पद्धतीने वाहतूक करणाऱ्या चौघांना धानोरा पोलिसांनी अटक केली. चव्हेला गावाजवळील जंगल परिसरात नाकाबंदी करून केलेल्या या कारवाईत ट्रेलर, कार, मोबाईल आणि गोवंश असा एकूण ३२ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या अमानुष वाहतुकीत चार जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला, तर ४७ गोवंशाची सुटका करण्यात आली.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या पथकाने १६ सप्टेंबरच्या रात्री चव्हेला गावाजवळील जंगल परिसरात नाकाबंदी केली. यावेळी CG-04-LL-3807 क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार आणि MH-12-BZ-4785 क्रमांकाचा १८ चाकी टाटा ट्रेलर संशयावरून थांबविण्यात आला.

पंचांसमक्ष ट्रेलरची तपासणी केली असता त्यामध्ये ५१ गोवंश दाटीवाटीने कोंबलेले आढळले. जनावरांच्या गळ्यात व पायात नायलॉनच्या दोऱ्या बांधण्यात आल्या होत्या. या क्रूर वाहतुकीदरम्यान दोन गायी आणि दोन बैलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने उर्वरित ४७ जिवंत जनावरांची सुटका केली.

कारवाईत २२ लाखांचा टाटा ट्रेलर, ४ लाखांची स्विफ्ट डिझायर कार, चार मोबाईल फोन आणि ५१ गोवंश असा एकूण ३२ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी मोहम्मद शाकीब मोहम्मद शकुर, नईमुद्दीन करीम मुद्दीन शेख, इरशाद उल्लाह खॉ आणि सय्यद जावीद सय्यद जाबीर या चौघांना अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय रमेश कोरडे करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here