गडचिरोली : अभिजित दिपकेंच्या दौऱ्याची चाहूल लागताच प्रशासन जागे, डुम्मे शाळेत एका दिवसात नळ बसवला

88

गडचिरोली : अभिजित दिपकेंच्या दौऱ्याची चाहूल लागताच प्रशासन जागे, डुम्मे शाळेत एका दिवसात नळ बसवला
– वर्षानुवर्षे प्रलंबित मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष, आता मात्र प्रशासनाची तातडीची धावपळ
The गडविश्व
एटापल्ली, दि. १७ : सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांच्या गडचिरोली जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली तालुक्यातील डुम्मे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, दीपके यांच्या नियोजित दौऱ्याची माहिती मिळताच शाळेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची नळाची व्यवस्था अवघ्या एका दिवसात करण्यात आली. त्यामुळे सुविधा एका दिवसात उपलब्ध करून देता येत असेल, तर त्यासाठी यापूर्वी इतका कालावधी का लागला, असा सवाल उपस्थित होत आहे.

डुम्मे शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून, ती निर्लेखित करण्यासाठी २०२३ पासून पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप या प्रश्नावर ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे चित्र आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत वर्ग असलेल्या या शाळेत ५७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोन वर्गखोल्या, दोन शिक्षक आणि एक मुख्याध्यापक कार्यरत असल्याने शैक्षणिक व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचीही समस्या कायम आहे. ग्रामपंचायतीने तब्बल दोन वर्षांपूर्वी यासाठी मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही प्रश्न प्रलंबित राहिल्याचे समोर आले. पाहणीच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी तात्पुरती साफसफाई करण्यात आल्याचेही दिसून आले.

वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पंख्यांची सुविधा नसताना कार्यालयात पंखा असल्याचे निदर्शनास आले. तसेच शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यल्प मानधन मिळत असल्याची बाबही समोर आली.

दरम्यान, शाळेतील पोषण आहाराची व्यवस्था समाधानकारक असल्याचे पाहणीत आढळले. मात्र, जीर्ण इमारत, अपुऱ्या वर्गखोल्या, मनुष्यबळाची कमतरता, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न पाहता ग्रामीण भागातील शाळांबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाहणीपूर्वी एका दिवसात झालेली पाण्याची व्यवस्था ही या संपूर्ण कारभाराचे गांभीर्य अधोरेखित करणारी ठरली आहे.
#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here