गडचिरोलीच्या विकासावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; अशोक नेते यांचा महेंद्र ब्राह्मणवाडेंवर निशाणा

82

गडचिरोलीच्या विकासावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने; अशोक नेते यांचा महेंद्र ब्राह्मणवाडेंवर निशाणा
– रेल्वे, उद्योग, आरोग्य व रस्ते प्रकल्पांचा दाखला देत काँग्रेसवर दिशाभूल केल्याचा आरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांवरून काँग्रेसकडून मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात येणारी टीका ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी केला. गडचिरोलीच्या विकासकामांची वस्तुस्थिती नाकारून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
गेल्या काही वर्षांत गडचिरोलीमध्ये उद्योग, रेल्वे, महामार्ग, आरोग्य, सिंचन आणि हवाई कनेक्टिव्हिटीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू झाल्याचे नेते यांनी सांगितले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे व काही स्थानिक नेते सोशल मीडिया, व्हिडिओ आणि रील्सच्या माध्यमातून जिल्ह्यातील समस्या दाखवत सरकारवर टीका करीत आहेत. मात्र, पूर्वीच्या गडचिरोलीची परिस्थिती आणि आज सुरू असलेली विकासकामे यांची तुलना केली तर बदल स्पष्ट दिसून येतो, असा दावा नेते यांनी केला.
वडसा-गडचिरोली ब्रॉडगेज रेल्वेमार्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कोनसरी येथील औद्योगिक प्रकल्प, राष्ट्रीय महामार्गांचे काम, सिंचन प्रकल्प आणि प्रस्तावित विमानतळ या प्रकल्पांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. अधिकृत माहितीनुसार वडसा-गडचिरोली नवीन रेल्वेमार्गाची लांबी ५२ किलोमीटर असून सुधारित प्रकल्प खर्च १,८८६ कोटी मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पाचे काम सुरू असून भूसंपादनासह विविध प्रक्रिया सुरू आहेत.
कोनसरी येथील पोलाद उद्योगामुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना मिळत असून स्थानिक रोजगाराच्या संधी वाढत असल्याचेही नेते यांनी सांगितले. कोनसरी प्रकल्पांतर्गत स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केला आहे.
गडचिरोलीतील सिंचन प्रकल्प, रस्ते, पूल, कौशल्य विकास आणि आदिवासी भागातील रोजगाराच्या संधी याबाबतही शासनाकडून विविध उपक्रम सुरू असल्याचे नेते यांनी नमूद केले. जिल्ह्यातील विकास हा केवळ घोषणांपुरता मर्यादित नसून अनेक प्रकल्प प्रत्यक्षात येत असल्याचा त्यांचा दावा होता.

‘विकासाच्या मुद्द्यावर खुली चर्चा करा’

काँग्रेस नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी विकासकामांच्या आकडेवारीवर खुली चर्चा करावी, असे आव्हान अशोक नेते यांनी दिले. रेल्वे व महामार्गांचा निधी, वैद्यकीय महाविद्यालय, कोनसरी व सुरजागडमधील औद्योगिक विकास, स्थानिक रोजगार तसेच सिंचन प्रकल्पांवर तथ्यांच्या आधारे चर्चा करण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोलीचा विकास हा आजच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू असायला हवा. जनतेला केवळ आरोप-प्रत्यारोप नकोत, तर प्रत्यक्ष विकास हवा आहे, असेही नेते यांनी नमूद केले. गडचिरोलीच्या बदलत्या विकासचित्राचे श्रेय त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here