आश्रमशाळेतील हिमांशीचे अप्पर आयुक्तांकडून कौतुक

60

आश्रमशाळेतील हिमांशीचे अप्पर आयुक्तांकडून कौतुक
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. २२ : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शासकीय प्रशासनाची ओळख करून देत त्यांच्यात आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने नागपूर येथील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात आयोजित ‘अप्पर आयुक्त कार्यालय ओळखा – संवादमंच’ उपक्रमात कोरची येथील आश्रमशाळेतील चिमुकली विद्यार्थिनी कु. हिमांशी महेश नरोटे हिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी संवादामुळे मा. आदिवासी अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांनी तिचे विशेष कौतुक केले.
२१ जानेवारी रोजी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोरची येथील १० विद्यार्थ्यांच्या पथकाने नागपूर येथील अप्पर आयुक्त कार्यालयास शैक्षणिक भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांना कार्यालयीन कामकाज, प्रशासकीय प्रक्रिया तसेच आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
या दौऱ्यात इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या हिमांशी नरोटे हिचा निरागस पण ठाम आत्मविश्वास सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. तिने विचारलेले प्रश्न, तिची समज आणि शिकण्याची उत्सुकता पाहून अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांनी चक्क तिला आपल्या खुर्चीवर बसवून मनमोकळा संवाद साधला. एका चिमुकलीतील बौद्धिक चाणाक्षपणा पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी श्रीमती गिरीजा देवीदास उईके, सहाय्यक प्रकल्प (शिक्षण) अधिकारी, नागपूर उपस्थित होत्या.
“अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रशासनाविषयी आवड निर्माण होत असून त्यांच्या भविष्यातील वाटचालीस नवी दिशा मिळत आहे,” असे मत आश्रमशाळा कोरचीचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक यांनी व्यक्त केले.

सर्वस्तरातून अभिनंदन

हिमांशी व तिचे वर्गशिक्षक मनोज आचार्य यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अरुण एम., सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) तसेच सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डॉ. प्रभू सादमवार यांनी अभिनंदन केले आहे. हिमांशीच्या या आत्मविश्वासामुळे कोरची परिसरात तिचे कौतुक होत असून, ती आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here