अशोकधाम मंदिरात काळजाचा थरकाप! अफवेने उडवला गर्दीचा धीर; चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा मृत्यू

26

अशोकधाम मंदिरात काळजाचा थरकाप! अफवेने उडवला गर्दीचा धीर; चेंगराचेंगरीत ६ भाविकांचा मृत्यू
– विजेचा प्रवाह सुरू असल्याच्या अफवेने धावपळ, अनेक जखमी
The गडविश्व
लखीसराय, दि. १७ : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिर परिसरात सोमवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. जलाभिषेकासाठी मंदिरात आलेल्या भाविक आणि कावडियांच्या प्रचंड गर्दीत अचानक चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही दुर्घटना अशोकधाम स्थानकापासून मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. या मार्गावर आदल्या रात्री विजेचा खांब आणि त्याच्या तारा पडल्या होत्या. सोमवारी सकाळी जलाभिषेकासाठी हजारो भाविक या मार्गावरून मंदिराकडे जात असताना पडलेल्या खांबातून विद्युतप्रवाह सुरू असल्याची अफवा अचानक पसरली.
अफवा पसरताच गर्दीत भीतीचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचवण्यासाठी भाविकांनी अचानक सर्व दिशांनी धाव घेतली. या धावपळीत अनेकजण खाली पडले आणि गर्दीतील इतर भाविक त्यांच्यावरून गेल्याने चेंगराचेंगरी झाली. काही क्षणांतच घटनास्थळी किंकाळ्या आणि मदतीसाठी आक्रोश सुरू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने जखमींना गर्दीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
एका अफवेमुळे काही क्षणांतच जलाभिषेकासाठी जमलेल्या भाविकांच्या गर्दीचे रूपांतर मृत्यूच्या तांडवात झाले. या दुर्घटनेनंतर मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

#thegdv #thagadvishva #gadchirolinews #AshokDhamTemple #Lakhisarai #BiharNews #Stampede #TempleAccident #BreakingNews #Devotees #Kanwariya #LakhisaraiNews #BiharNews #TempleNews #LatestNews #IndiaNews #NewsUpdate #ViralNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here