बेडगाव पोलीस मदत केंद्रात आरोग्याचा महोत्सव ; 166 नागरिकांची मोफत तपासणी

25

बेडगाव पोलीस मदत केंद्रात आरोग्याचा महोत्सव ; 166 नागरिकांची मोफत तपासणी
– 64 जणांना शस्त्रक्रियेसाठी रेफर
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ११ :  गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमाअंतर्गत पोलीस मदत केंद्र बेडगाव येथे आयोजित भव्य आरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपूर येथील डॉक्टर शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या उपक्रमातून दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या संकल्पनेतून, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. प्रभारी अधिकारी दिनेश खोटेले व पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे यांच्या नेतृत्वात, पोलीस मदत केंद्रातील अधिकारी-अंमलदार, एसआरपीएफ व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.
सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत झालेल्या या मेळाव्यास सुमारे २०० ते २५० नागरिकांनी उपस्थिती लावली. यावेळी उपस्थितांना रोजगार मेळाव्याविषयी मार्गदर्शन करण्यात येत युवक-युवतींनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
मेळाव्यात नागपूरचे तज्ज्ञ डॉक्टर डॉ. जीवक काकडे तसेच ग्रामीण रुग्णालय कोरची येथील डॉ. प्रांजली करंजेकर व त्यांच्या पथकाने आरोग्य तपासणी केली. नेत्र, मधुमेह (शुगर), रक्तदाब (बीपी), इसीजी, हर्निया, अस्थिरोग, सिकलसेल व मलेरिया आदी विविध आजारांची तपासणी करण्यात आली. एकूण १६६ नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६४ रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.
याशिवाय, व्हीएलईच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, उत्पन्न व जातीचे दाखले आदी सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मेळाव्यानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम शांततेत व अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here