गडचिरोलीत ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ना हिरवा कंदील ; केंद्र चालकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

99

गडचिरोलीत ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ना हिरवा कंदील ; केंद्र चालकांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : नागरिकांना शासकीय सेवा गावपातळीवरच जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून विविध शासकीय सेवा नागरिकांना त्यांच्या परिसरातच मिळणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या ११७ केंद्रांपैकी ११५ केंद्रे ग्रामपंचायत स्तरावर तर २ केंद्रे नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या संचालनासाठी पात्र केंद्र चालकांची निवड करण्यात येणार असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
केंद्र चालक निवडीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत १६ जून ते ३० जून २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. अर्जाचा नमुना, केंद्रांची यादी तसेच पात्रता, अटी व इतर सविस्तर माहिती जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी gadchiroli.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आवश्यक माहिती प्राप्त करावी.
‘आपले सरकार सेवा केंद्रां’मुळे विविध दाखले, प्रमाणपत्रे, शासकीय योजना आणि ऑनलाइन सेवांचा लाभ नागरिकांना स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणार असून शासनाच्या डिजिटल सेवा व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here