पेडीगुड्डममध्ये हरित अभियानाला वेग ; वृक्षारोपणासह नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन
– वनसंरक्षण, वृक्षसंवर्धन आणि जनसहभाग वाढविण्यावर भर देण्याचे उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र हरित अभियान २०२६’ अंतर्गत आल्लापल्ली वनविभागाच्या पेडीगुड्डम वनपरिक्षेत्रात वृक्षारोपण कार्यक्रमासह नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
‘मिश्र रोपवन २०२६’ उपक्रमांतर्गत जामगाव येथील गोमनी उपक्षेत्रात पाच हेक्टर क्षेत्रावर विविध स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. उपविभागीय वनाधिकारी शिशुपाल पवार, पोलीस पाटील अरविंद निखाडे यांच्यासह मान्यवरांनीही वृक्षारोपणात सहभाग घेतला.
ग्रामस्थांशी संवाद साधताना दिपाली तलमले यांनी वृक्षलागवड हा केवळ एकदिवसीय कार्यक्रम नसून लोकचळवळ बनला पाहिजे, असे सांगत प्रत्येकाने लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
यानंतर नव्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन करून त्यांनी वनसंरक्षण, वनविकास, वनगुन्हे प्रतिबंध आणि जनसहभाग वाढविण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शासनाच्या वनविकास योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावरही त्यांनी भर दिला.
कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार, वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच जामगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.













