अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेला गडचिरोलीत प्रारंभ ; पहिल्या टप्प्यात २,५३९ शेतकरी पात्र

82

– ११.७४ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ; बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली,दि. २७ : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या असून, पहिल्या टप्प्यात २,५३९ शेतकरी पात्र ठरले आहेत. या लाभार्थी शेतकऱ्यांना ११ कोटी ७४ लाख ६६ हजार इतक्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, लाभ वितरणासाठी बायोमेट्रिक अथवा आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शासनाकडून प्राप्त झालेल्या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या २५ जुलै रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था तसेच गावपातळीवर प्रसिद्ध करण्यात आल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यापूर्वी २,९२६ पात्र कर्ज खात्यांची माहिती शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केली होती. त्यानंतर शासनाने पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध केली.
ही योजना पूर्णपणे ऑनलाइन व आधार क्रमांकावर आधारित असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी बायोमेट्रिक किंवा आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम समायोजित केली जाणार असल्याने लाभार्थ्यांनी कोणताही विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यादी प्रसिद्ध करण्याच्या कार्यक्रमाला जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था मुकुंद मेश्राम, कार्यालयाचे अधीक्षक लोमेश रंधये, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, कर्ज विभागाचे सरव्यवस्थापक राजू सोरते, उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर तोटावर, संबंधित संस्थांचे व्यवस्थापक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पात्र शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, यादीतील आपला क्रमांक किंवा आधार क्रमांक घेऊन जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अथवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत तातडीने जाऊन बायोमेट्रिक/आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ वेळेत मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here