देसाईगंज : बीएसएनएल कार्यालयासमोरील शासकीय जागेवर अतिक्रमणाचा विळखा

23

देसाईगंज : बीएसएनएल कार्यालयासमोरील शासकीय जागेवर अतिक्रमणाचा विळखा
– झाडे-झुडपे, कचरा आणि अनधिकृत बांधकामामुळे परिसर असुरक्षित, प्रशासनाच्या कारवाईची नागरिकांची मागणी
The गडविश्व
देसाईगंज, दि. २७ : शहरातील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कार्यालयासमोरील शासकीय मोकळ्या जागेवर वाढत्या अतिक्रमणामुळे परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य प्रवेशद्वारालगत तसेच कंपाऊंड वॉलच्या बाजूने अनधिकृत अतिक्रमण होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कार्यालयाच्या मुख्य गेटजवळ काटेरी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली असून, कचऱ्याचे ढिगारेही साचले आहेत. या अस्वच्छ व दुर्लक्षित परिस्थितीचा गैरफायदा घेत काही व्यक्तींनी मोकळ्या जागेवर टप्प्याटप्प्याने अनधिकृत ताबा मिळवण्यास सुरुवात केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
मुख्य रस्त्यालगत ही जागा असल्याने अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. शासकीय मालमत्तेचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या बीएसएनएल प्रशासनासह स्थानिक नगरपरिषद प्रशासनाकडून या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, संबंधित मोकळ्या जागेवरील अतिक्रमण तातडीने हटवून परिसराची स्वच्छता करण्यात यावी, तसेच शासकीय जागेचे कंपाउंड किंवा योग्य सीमांकन करून तिचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वेळेत ठोस कारवाई न झाल्यास अतिक्रमण अधिक बळावून शासकीय जागेवर कायमस्वरूपी पाय रोवण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here