२२ वर्षांच्या संघर्षातून साकारलेल्या कारगिल स्मारकात २७ वा कारगिल विजय दिन उत्साहात
– संस्थापक उदय धकाते यांच्या कार्याचा मान्यवरांकडून गौरव; शहीदांना भावपूर्ण अभिवादन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : कारगिल युद्धातील शहीद वीर जवानांच्या शौर्य, त्याग आणि पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी गडचिरोलीतील कारगिल स्मारकात रविवारी २७ वा कारगिल विजय दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ, कारगिल स्मारक समिती आणि माजी सैनिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाभरातील माजी सैनिक, विद्यार्थी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते यांच्या २२ वर्षांच्या अथक संघर्षाचा सर्वच मान्यवरांनी गौरव केला. गडचिरोलीत कारगिल स्मारक उभारण्यासाठी सन २००० पासून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून अखेर २०२२ मध्ये हे स्मारक साकार झाल्याचे वक्त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात देशभक्तीची प्रेरणा देणारे हे स्मारक शहीदांच्या स्मृती चिरंतन जपणारे राष्ट्रीय प्रेरणास्थळ असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात इंदिरा गांधी चौकातून माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या कारगिल विजय रॅलीने झाली. रॅलीत शालेय विद्यार्थी, युवक, नागरिक तसेच आमदार डॉ. मिलिंद नरोटे सहभागी झाले. कारगिल चौकातील स्मारकावर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीदांना भावपूर्ण अभिवादन केले.
मुख्य कार्यक्रमात वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, गुणवंत पाल्य तसेच विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, लेफ्टनंट कर्नल रामनाथ स्वामी, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ महाव्यवस्थापक कृष्णा रेड्डी, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, माजी नगराध्यक्षा योगिता पिपरे, वीरपत्नी चंदनखेडे, व्यापारी संघटनेचे घिसूलाल काब्रा, होमराज डोनाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘कारगिल स्मारक हे देशभक्तीचे प्रेरणास्थान’
मनोगत व्यक्त करताना सर्व मान्यवरांनी उदय धकाते यांच्या अथक प्रयत्नांमुळे उभारलेले कारगिल स्मारक हे केवळ स्मारक नसून शहीदांच्या शौर्याची प्रेरणा देणारे राष्ट्रीय स्मृतिस्थळ असल्याचे सांगितले. भावी पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागृत ठेवण्यासाठी ते गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत असून अशा उपक्रमांची समाजाला गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाला विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, माजी सैनिक, महिला, युवक, विद्यार्थी आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश भांडेकर, कालू गोवर्धन, नंदू कुमरे, प्रकाश धकाते, मोबीन सय्यद, सुचिता धकाते, वनिता धकाते, महेंद्र मसराम, रुपेश सलामे, बाळू मोटघरे, वैभव रामटेके, राजू डोंगरे, सुचिता कामडी, प्रा. सुनीता साळवे, स्मिता दुधे, प्रमिला कुंभारे, प्रा. पारखी, माधुरी दहिकर, अंजली कुळमेथे, हरबा मोरे, श्रीकांत पतरंगे, अनिल पोहणकर, चंद्रशेखर भडांगे, ऋषी वंजारी (से.नि.), हवालदार डिसेज वालदे (नि.), हवालदार महादेव वासेकर (नि.), हवालदार विनायक गेडाम (नि.), राजू भांडेकर आणि विठ्ठल राऊत (नि.) यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी सैनिक डिसेज वालदे यांनी केले.













