गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद एकवटणार; उद्या भव्य पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा

22

गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद एकवटणार; उद्या भव्य पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा
– जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनबांधणीला नवी गती, आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम करणार मार्गदर्शन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी जिल्हाध्यक्ष रविंद्र प्र. वासेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, दि. १३ जुलै रोजी दुपारी १ वाजता चंद्रपूर रोडवरील अभिनव लॉन, गडचिरोली येथे भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करणे, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांची रणनीती निश्चित करणे, तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे, हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी दिली.
मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा अहेरीचे आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र वासेकर राहणार आहेत. यावेळी जिल्ह्यातील औद्योगिक विकास, शेतकरी, शेतमजूर, महिला, भूमिहीन नागरिक तसेच बेरोजगार युवक-युवतींसाठी शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटनात्मक जबाबदाऱ्या, पक्षाची भूमिका आणि निवडणूक तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.
मेळाव्यास पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी आमदार, विविध आघाड्यांचे पदाधिकारी तसेच जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद अधिक सक्षम होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन रविंद्र वासेकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here