गडचिरोली : जागतिक वन दिन उत्साहात साजरा

139

जागतिक वन दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना सफारीचे आयोजन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : सामाजिक वनिकरण विभागामार्फत आज २१ मार्च रोजी जागतिक वन दिनाचे औचित्य साधून शाळकरी मुलांसाठी सफारी व निसर्गानुभवाचे गुरवळा नेचर सफारी येथे आयोजन करण्यात आले होते.
या सफारीमध्ये हरित सेना शाळा भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिरोली, विद्याभारती कन्या हायस्कूल गडचिरोली, शंकरराव मल्लेरवार हायस्कूल बोदली व कै. गोविंदराव हायस्कूल खरपूंडी अशा शाळांमधील एकूण ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. तसेच सोरदे, भैसारे, मेश्राम, खांडरे आणि पुकटे मॅडम या शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत निसर्गानुभव घेत वन दिन साजरा केला.
संयुक्त राष्ट्र संघाने मान्यता दिल्याप्रमाणे संपूर्ण जगभर २१ मार्च २०१३ रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा करण्यात आला होता. वनांचा मानवी जिवनाशी असलेला सरळ संबंध, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली आणि सोबतच जंगलावर आपली उपजीविका भागवणाऱ्या जमाती आणि जैवविविधता याबाबत लोकांमध्ये जागरुकता पसरवण्यासाठी आणि जंगल निर्माण, संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशांसाठी २१ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
हवामान बदलांशी जुळवून घेणे तसेच जैवविविधतेच्या रक्षण करण्याच्या कामी वन-परिसंस्था महत्त्वाची भूमिका बजावते. हवामान बदलास कारणीभूत असलेल्या हरितगृह वायूंना (Green House Gases) शोषून घेण्याचे तसेच जागतिक तापमानवाढ व ओझोन वायूचे कमी होणारे थर नियंत्रित ठेवण्याचे काम वनांकडून केले जाते. त्यामुळे वनांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.
सदर कार्यक्रम नागपूर सामाजिक वनिकरण वृत्ताचे वनसंरक्षक, डॉ. किशोर मानकर, गडचिरोली सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी गणेशराव झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली सामाजिक वनिकरण परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gurvalaneturesafari #forest #nationforestday )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here