गडचिरोली : तेंदूपत्ता संकलन करताना रानडुकराचा हल्ला, तिघेजण जखमी

88

गडचिरोली : तेंदूपत्ता संकलन करताना रानडुकराचा हल्ला, तिघेजण जखमी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : तालुक्यातील खुर्सा गावालगतच्या जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या नागरिकांवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची घटना रविवारी (०३) सकाळी उघडकीस आली. या घटनेत तीन जण जखमी झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
जखमींमध्ये राजू एकनाथ मेश्राम (४०), सावन पुरुषोत्तम चौधरी (२६) आणि चंदा आबाजी कठाणे (१६), सर्व रा. खुर्सा यांचा समावेश आहे. राजू मेश्राम व चंदा कठाणे यांना किरकोळ दुखापत झाली, तर सावन चौधरी यांच्या कमरेला मार लागला आहे.
सध्या जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन हंगाम सुरू असल्याने ग्रामीण भागातील अनेक नागरिक दररोज सकाळी जंगलात जात आहेत. त्यानुसार खुर्सा येथील काही नागरिकही रविवारी पहाटे गावाजवळील जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी झुडपामध्ये लपून बसलेल्या रानडुकराने अचानक धाव घेत त्यांच्यावर हल्ला चढवला.
अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली. जखमी नागरिकांनी मदतीसाठी आरडाओरड करताच जवळच असलेल्या इतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांची गर्दी आणि गोंधळ पाहून रानडुकराने जंगलाच्या दिशेने पळ काढला. त्यामुळे आणखी मोठी दुर्घटना टळली.
घटनेनंतर जखमींना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे स्पष्ट केले.
तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांनी शक्यतो समूहाने जावे, झुडपी भागात विशेष काळजी घ्यावी आणि वन्यप्राण्यांची चाहूल लागताच तत्काळ सुरक्षित स्थळी जावे, असे आवाहन वन विभागाने केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #gadchiroliforest #Gadchiroli #TenduPatta #WildBoarAttack #Khursa #ForestNews #BreakingNews #Maharashtra #GadchiroliNews #WildlifeAttack #LocalNews #Injured #JungleIncident #TrendingNews #BoarAttack #TenduCollection

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here