गडचिरोली : पहाटेच पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, सात जणांवर हल्ला

31

गडचिरोली : पहाटेच पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; सात जणांवर हल्ला
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथे पहाटेच्या सुमारास पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत एकाच वेळी सात जणांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात सातही जण जखमी झाले असून, काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे मुरखळा चक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी नागरिकांची वर्दळ सुरू असतानाच एका पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक नागरिकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आतच कुत्र्याने एकापाठोपाठ सात जणांना चावा घेत जखमी केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मुरखळा चकचे उपसरपंच सौरभ पाल यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यांनी कोणताही विलंब न करता सर्व सातही जखमींना उपचारासाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्यात आले.

दरम्यान, मुरखळा चक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेऊन त्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. विशेषतः पहाटेच्या वेळी नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

एका पिसाळलेल्या कुत्र्याने एकाच पहाटे सात जणांवर हल्ला केल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #chamorshinews #dogattack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here