– पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहिदांच्या कुटुंबियांच्या समस्या जाणून घेत साधला संवाद
The गडविश्व
गडचिरोली, दि.०९ : जिल्हा स्थापन झाल्यापासुन आजपावेतो गडचिरोली पोलीस दलातील २१२ पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी माओवाद्यांशी लढतांना आपले धारोष्ण रक्त वाहुन आपल्या असीम शौर्याचे व सामर्थ्याचे प्रदर्शन घडवित देशसेवेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. या जाज्वल्य कामगिरीत २१२ वीर जवानापैकी १६९ (०५ वीर महिला जवानासह) वीर जवान हे गडचिरोली जिल्हयाचे भुमीपुत्र असुन ४३ वीर जवान हे राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, भारतीय राखीव दल, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस दल व राज्य गुप्तवार्ता विभाग या सुरक्षा दलातील आहेत.
काल ०८ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळी सणानिमित्य दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गडचिरोली पोलीस दलाकडुन शहिद जवांनाच्या कुटुंबियांच्या समस्या जाणुन घेण्याकरिता संवाद बैठकीचे व फराळ आणि मिठाई वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शहिद जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधतांना त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या तसेच उपस्थितांना संबोधितांना सांगितले की, गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असतांना पोलीस जवान नेहमी आपल्या कुटुंबिंयांपासुन दुर राहुन आपले कर्तव्य बजावत असतात. कर्तव्य बजावत असतांना जेव्हा एखादा पोलीस जवान शहिद होतो त्यावेळेस त्यांच्या कुटुंबिंयांना अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. गडचिरोली पोलीस दल सतत त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत असते. गडचिरोली पोलीस दल शहिद जवानांच्या कुटुंबियांच्या नेहमीच पाठीशी असुन गडचिरोली पोलीस दलाचे पहिले प्राधान्य हे शहिद कुटुंबींय असेल. तसेच दिवाळी सणानिमित्य सर्व शहिद जवानांच्या कुटुंबिंयांना शुभेच्छा देऊन वरिष्ठांच्या हस्ते फराळ व मिठाईचे वाटप करण्यात आले व सर्व शहिद जवानांच्या कुटुंबिंयासाठी जेवणाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाकरिता पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. व अपर पोलीस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख सा. हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी जनसंपर्क/प्रोपागंडा (न.से.) शाखा गडचिरोली व सर्व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.