जल्लोषपुर्ण व उत्साहाच्या वातावरणात पार पडली गडचिरोली महा मॅरेथॉन स्पर्धा

124

– स्पर्धेत ९ ते १० हजार युवक युवती व नागरिकांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, ५ मार्च : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने एक धाव आदिवासी विकासासाठी या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवार ०५ मार्च २०२३ रोजी जिल्हा परिषद मैदानावर भव्य महा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन पार पडले. अतिशय जल्लोषपूर्ण व उत्साहाच्या वातावरणात गडचिरोली जिल्ह्यातील ९ ते १० हजार युवक युवती व नागरिकांनी मॅरेथॉन स्पर्धा पुर्ण केली.
या महा मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, अपर पोलीस महासंचालक, (वि.कृ.), म.रा. मुंबई प्रविण साळुंके, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र नागपूर संदिप पाटील, जिल्हाधिकारी शसंजय मीणा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, न्यायाधिश आर. आर. पाटील, चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, गडचिरोलीचे वनसंरक्षक किशोर मानकर, गडचिरोली उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मैनक घोष, उपविभागीय अधिकारी एटापल्ली शुभम गुप्ता, आर. एस. बाळापूरकर, कमान्डट, ९ बटा. केरिपुबल, एम. एच खोब्रागडे, कमान्डट, ३७ बटा. केरिपुबल इ. मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
गडचिरोली सारख्या नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या व्यापक स्वरुपात मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील युवक युवतींच्या कलागुणांना वाव मिळावा व प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे नाव उंचवावे या उदात्त हेतूने गडचिरोली पोलीस दलाने वेगवेगळ्या स्पर्धा व मेळाव्यांच्या माध्यमातून नेहमीच पाठबळ दिले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमागचा उद्देश देखिल हाच होता की, जिल्ह्यातील युवक युवतींनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन एक चांगली कामगिरी करावी. आज झालेली स्पर्धा ही ३ कि.मी., ५ मि.मी. व १० कि.मी. अशा वेगवेगळ्या तीन प्रकारात घेण्यात आली व प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय असे एकुण ९ महिला व ९ पुरुषांनी विजेतेपद पटकाविले. तसेच जेष्ठ नागरिक या गटातील एकुण ३ महिला व ३ पुरुषांनी विजेतेपद पटकाविले.
३ कि.मी. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ११,०००/-, ८०००/- व ५०००/- रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र, ५ कि.मी. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १५,०००/-, ११०००/- व ८००० /- रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र व १० कि.मी. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे २१,०००/-, १५०००/- व ११०००/- रु. रोख, ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सकाळी ५.३० वा. मॅरेथॉन स्पर्धा सुरु होऊन त्याची सकाळी ९.३० वा. सांगता करण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, गुडी बॅग, पदक व सहभागीतेचे प्रमाणपत्र तसेच नाश्ता देण्यात आला. स्पर्धकांचा उत्साह वाढावा यासाठी झुंबा, डीजेची सोय करण्यात आली होती. तसेच या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण गडचिरोली पोलीस दलाच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर करण्यात आले. सदर स्पर्धा ही जिल्हा परिषद मैदानापासून सुरु होऊन चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौक, रिलायंस पेट्रोलपंप, कारगील चौक, इंदीरागांधी चौक, ट्रेंड्स मॉल पासुन परत जिल्हा परिषद मैदान या मार्गे घेण्यात आली.
सदर महा मॅरेथॉन स्पर्धेसाठी मायाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज वडसा, भूमी एंपायर, अजयदिप कंन्स्ट्रक्शन, गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक, हल्दीराम्स, डी.सी. गुरुबक्षानी, हर्ष ज्वेलर्स आरमोरी, वायुनंदन पॉवर लिमीटेड, धात्रक ब्रदर्स, स्वागत सेलिब्रेशन आरमोरी, महात्मा गांधी विद्यालय आरमोरी, बी. एफ. मेहता ॲण्ड कंन्स्ट्रक्शन कंपनी, देशमुख बोअरवेल्स, सी एस घारपुरे, व्ही. बी. बोम्मावार, वेन्सर कंन्स्ट्रक्शन व टायगर ग्रुप यांनी हातभार लावून मोलाचा वाटा उचलला. तसेच या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा, स्वप्निल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पेढरी मयुर भुजबळ व इतर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी व अंमलदार, पोस्टे / उपपोस्टे / पोमकेंचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Gadchiroli Maha Marathon was held in an atmosphere of joy and excitement) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here