– विविध तर्कवितर्काना उधाण
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : जिल्ह्यातील रेंगेवाही उपक्षेत्रातील जंगल परिसरात एका बेपत्ता असलेल्या इसमाचा धडावेगळा मृतदेह आढळल्याची घटना २० जानेवारी रोजी उघडकीस आली. सदर घटनेने खळबळ उडाली असून घातपात की वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहे. बापूजी नानाजी आत्राम ( ४५) रा. लोहारा ता. मूलचेरा असे मृतकाचे नाव असल्याचे कळते.
मृतक हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता असे कळते. जिल्ह्यात व्याघ्र हल्ले वाढले असून सदर घटनेच्या परिसरातून दोन दिवसापूर्वीच महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यात आले. तर याच जंगल परिसरात आत्राम यांचा मृतदेह धडावेगळा आढळून आला आहे. घटनास्थळी धड आहे तर शीर नाही अशी माहिती असून या घटनेमागे घातपात की व्याघ्र हल्ला असे विविध तर्क लावण्यात येत असून पोलिसांच्या तापसानंतरच ते कळणार आहे.
दरम्यान गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांचे मनुष्यावरील हल्ले वाढत असून मानव वन्यजीव संघर्ष निर्माण होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
