विकासाच्या नावाखाली साधनसंपत्तीची लुट करण्याचे भाजपचे धोरण : शेकाप नेते भाई रामदास जराते

359

– भाजपचे सरकार आदिवासी विरोधी अशी टिका
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : भारतीय जनता पक्षाचा धार्मिक आणि जातीयवादी अजेंडा आदिवासींच्या उरावर बसला असून भांडवलदारांना हाताशी धरुन गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्तीची लूट केली जात आहे. ब्राह्मणी देवधर्म थोपवून मुळनिवासी संस्कृती संपविण्याचे काम केले जात असून विकासाच्या नावाखाली खाणी खोदून आदिवासी समाजाचे अस्तित्व संपविण्याचे काम करणाऱ्यांपासून सावध राहावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी केले.
जय पेरसापेन आदिवासी क्रीडा मंडळाच्या वतीने तालुक्यातील जमगाव येथे आयोजित भव्य कबड्डी व व्हालिबाॅल स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. भाई रामदास जराते पुढे म्हणाले की, काही लोक विकास आणि फुकटचे आमिष दाखवून लोकांना खुष करण्याचा आणि भक्ती पेक्षा राममंदिराचा इव्हेंट करुन मुर्ख बनविण्याचे प्रयत्न करीत आहेत. मात्र आदिवासींच्या प्रथा, परंपरा या वेगळ्या असून अशा प्रकाराला बळी पडून आपली संस्कृती नष्ट करु नये. तसेच खेळासाठी एकत्र आलेल्या तरुणांनी आपली साधनसंपत्ती वाचवण्यासाठी सरकार विरोधात संघर्ष करण्याची गरज असल्याचेही प्रतिपादन भाई रामदास जराते यांनी केले.
कबड्डी व व्हालिबाॅल स्पर्धेच्या उद्घाटनला उद्घाटक म्हणून आमदार डॉ.देवराव होळी तर प्रमुख अतिथी म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, पुरुषोत्तम रामटेके, प्रतिक डांगे, भाजपचे तालुकाध्यक्ष हेमंत बोरकुटे, आदिवासी विकास युवा परिषदेचे जिल्हाध्यक्ष विनोद मडावी, जमगावचे सरपंच देविदास मडावी, ग्रामपंचायत सदस्य मारोती हिचामी, बाबुराव नरोटे, नागसू कुमरे, खुशाल गावडे, महेश कुमरे,भाऊजी गावडे, वासुदेव गावडे,तुंगा किरंगे, तसेच जय पेरसापेन युवा मंडळाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, राज बन्सोड यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक आणि ७० पेक्षा अधिक संख्येने खेळाडू संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here