गडचिरोली जिल्ह्याची आरोग्य सेवा होणार अधिक बळकट ; जिल्ह्याला मिळाले १९ वैद्यकीय अधिकारी

631

– जिल्हा निवड समितीमार्फत शिघ्रतेने पदभरती
The गडविश्व
गडचिरोली दि. २० : जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने दुर्गम भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांची निकड लक्षात घेता पावसाळ्यापूर्वीच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केन्द्राकरिता वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावे, याकरिता जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष विजय भाकरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह व समितीने शिघ्रतेने कार्यवाही करत दोन दिवसातच ८० कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखत घेवून लगेचच १९ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
जिल्ह्यामध्ये आरोग्य सेवा बळकट करणे आवश्यक असल्याने सदरची नियुक्ती प्रक्रिया तातडीने राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी दिली. ग्रामीण भागात आरोग्य अधिकारी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह अनेक दिवसांपासून आग्रही होत्या.
जिल्हा परिषद,गडचिरोली आरोग्य विभाग अतंर्गत ०६ एम.बी.बी.एस.व १३ बी.ए.एम.एस अहर्ता धारक वैद्यकीय अधिकऱ्यांच्या रिक्त पदाकरिता थेट मुलाखत १८ जून २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे पार पडली. याकरिता वृत्तपत्रात जाहिरात तसेच एन.आय.सी. व जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशीत करण्यात आलेली होती. या पदभरतीकरिता गडचिरेाली, गोदिया, चंद्रपुर, नागपुर, भंडारा, अमरावती, यवतमाळ या जिह्यातील एम.बी.बी.एस. व बी.ए.एम.एस. शैक्षणीक अहर्ता धारक उमेदवार उपस्थीत होते. विशेष म्हणजे १९ जागांकरिता ८० अर्ज प्राप्त झाले होते. जिल्ह्यात आरोग्य सेवेत काम करण्यासाठी प्रथमच चांगला प्रतिसाद मिळाला.

या प्राथमिक आरोग्य केंद्रावर मिळाले नवनियुक्त वैद्यकीय अधिकारी

येनाापूर, कारवाफा, पेंढरी, अडपल्ली, कसनसुर, रांगी, सावंगी, वैरागड, देवूळगाव, आमगाव, गट्टा, झिंगानूर, रंगय्यापल्ली, कमलापूर, कसनसुर, आरेवाडा, अंगारा, लगाम व फिरते आरोग्य पथक कोरची या १९ प्राथमिक आरोग्य केंद्रावर नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.

नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सात दिवसात रूजू व्हावे अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द करून प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल, अशा सूचना नियुक्ती आदेशात देण्यात आल्या असल्याचे जिल्हा निवड समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी कळविले आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #hospitalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here