गडचिरोली : अपघात रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर; अतिक्रमण हटाव मोहीम आणि रस्ते दुरुस्तीचे आदेश

11

गडचिरोली : अपघात रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर; अतिक्रमण हटाव मोहीम आणि रस्ते दुरुस्तीचे आदेश
– रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडांचे कडक निर्देश, अपघाती मृत्यूंमध्ये ३३.५६ टक्के घट
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यात रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत घट झाली असली, तरी अपघातांची एकूण संख्या वाढल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, अतिक्रमण हटाव मोहीम, वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी आणि अपघातांच्या कारणांचा सखोल अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील अपघातांची आकडेवारी, रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल, राष्ट्रीय महामार्गांची प्रलंबित कामे तसेच गडचिरोली शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता तथा रस्ता सुरक्षा समितीच्या सचिव सोनाल चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरणे मोरे, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अपघात वाढले, मृत्यू घटले

बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्ह्यात १७७ रस्ते अपघातांत १४६ जणांचा मृत्यू झाला होता. तर जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत २१० अपघातांत ९७ जणांचा मृत्यू झाला. तुलनात्मक कालावधीत मृत्यूंच्या संख्येत ३३.५६ टक्के घट झाली असली, तरी अपघातांची संख्या वाढल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
एकूण ९७ मृत्यूंपैकी ५९ मृत्यू दुचाकीस्वारांचे आहेत. त्यामुळे हेल्मेट वापराच्या नियमाची प्रभावी अंमलबजावणी करावी. अतिवेगाने तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले.
अपघातानंतर केवळ गुन्हा नोंदविण्यापुरते मर्यादित न राहता रस्त्यांची स्थिती, वाहनांचा वेग आणि अपघाताची अन्य संभाव्य कारणे यांचा सखोल अभ्यास करून भविष्यातील अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले.

रस्तेदुरुस्तीच्या कामांना गती

राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवरील प्रलंबित कामांच्या संथ गतीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गडचिरोली–आरमोरी, चामोर्शी, धानोरा तसेच आष्टी–आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील खड्डे बुजविण्यासह आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रस्त्यांची नियमित देखभाल न करणाऱ्या कंत्राटदारांना केवळ नोटिसा देऊन थांबू नये. नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी आणि आवश्यकतेनुसार संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असेही त्यांनी सांगितले.

अतिक्रमण हटाव मोहीमेला वेग

गडचिरोली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. इंदिरा गांधी चौकाची विहित मानकांनुसार पुनर्रचना करण्याबाबत कार्यवाही करावी. आठवडी बाजार परिसर, फळ-भाजी विक्रेत्यांची ठिकाणे तसेच दुकानांसमोरील रस्त्यांवरील अतिक्रमणे नगरपरिषद आणि पोलिस विभागाने संयुक्तपणे हटवावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
रस्ता सुरक्षा निधी आणि जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या (डीएमएफ) निधीतून वाहतूक सिग्नल, गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे, रुग्णवाहिका आणि बॉडी कॅमेऱ्यांसाठीच्या प्रस्तावांना गती देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

अनधिकृत बसथांब्यांवरही कारवाई

एसटी तसेच खासगी बसगाड्यांनी शहरातील अनधिकृत ठिकाणी थांबू नये, यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. वाहनांवरील वेगनियंत्रक उपकरणे कार्यरत आहेत की नाही, याची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देशही देण्यात आले.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि अतिक्रमण या तिन्ही बाबींवर एकाचवेळी ठोस उपाययोजना करण्याची गरज जिल्हाधिकारी पंडा यांनी व्यक्त केली.

#thegdv #gadchirolipolice #gadchirolinews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here