देसाईगंज : पावसाने फिरवली पाठ, धानाची परे करपण्याच्या उंबरठ्यावर, खरीप हंगाम संकटात

76

देसाईगंज : पावसाने फिरवली पाठ, धानाची परे करपण्याच्या उंबरठ्यावर, खरीप हंगाम संकटात
– महिनाभरापासून पावसाचा पत्ता नाही, वीजेच्या लपंडावामुळे बोअरवेलही बंद, रखडलेले धान चुकारे व बोनसामुळे शेतकऱ्यांची कोंडी
The गडविश्व
ता. प्र/ वडसा, दि. १५ : चालू खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच वडसा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. मृग नक्षत्रात मोठ्या आशेने टाकलेल्या धानाच्या ‘पऱ्या’ आता महिनाभराच्या झाल्या असतानाही पावसाने पूर्णपणे दडी मारली आहे. परिणामी, अनेक गावांतील पऱ्या करपण्याच्या मार्गावर असून त्या वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची शेतात धावपळ सुरू आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या हलक्या पावसानंतर शेतकऱ्यांनी रोवणीच्या तयारीसाठी पऱ्या टाकल्या; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण नियोजन विस्कळीत झाले आहे.

वीज पुरवठ्याचा बोजवारा; बोअरवेलही ठप्प

पावसाअभावी शेतकरी विहिरी व बोअरवेलच्या पाण्याच्या आधारे पऱ्या वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, ग्रामीण भागातील सततचे लोडशेडिंग आणि कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बोअरवेल सुरू करणेही कठीण झाले आहे. विहिरी आणि बोअरवेल उपलब्ध असूनही पुरेशी वीज नसल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या डोळ्यांसमोर पऱ्या करपत असल्याचे पाहावे लागत आहे.

रखडलेले चुकारे, बोनसही नाही

निसर्गाच्या अवकृपेबरोबरच शासकीय अनास्थेचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मागील रब्बी हंगामात शासकीय खरेदी केंद्रावर विकलेल्या धानाचे चुकारे अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाहीत. खते, बियाणे आणि मशागतीसाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने अनेकांना उसनवारी करावी लागत आहे. त्यातच यंदाचा धान बोनसही अद्याप जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
पावसाने आणखी ओढ दिली आणि वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर यंदाचा खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने तातडीने जिल्ह्यातील परिस्थितीचे सर्वेक्षण करून महावितरणमार्फत शेतीसाठी नियमित वीजपुरवठा करावा, तसेच रखडलेले धान चुकारे आणि बोनस तातडीने वितरित करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here