गडचिरोलीतही मतदार यादीत घोळ ; काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा मूलभूत अधिकार सत्ताधाऱ्यांच्या दुरुपयोगामुळे धोक्यात आला असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. भाजप सरकारने निवडणूक आयोगाला हाताशी धरून मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचे धक्कादायक वास्तव काँग्रेसकडून समोर आले असून, याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची तातडीची बैठक जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत जिल्ह्यातील विविध मतदार याद्यांमध्ये दुबार नोंदणी, मृत व्यक्तींची नावे कायम राहणे, तर हयात असलेल्या मतदारांची नावे गहाळ होणे अशा गंभीर त्रुट्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेसने या सर्व प्रकरणांचा सखोल तपास करून निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदविण्याचा व जिल्हाभर जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला.
अलीकडेच काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातील मतदार यादीतील गोंधळ आणि सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर राज्यभर सुरू झालेल्या चौकशी मोहिमेचा एक भाग म्हणून गडचिरोली जिल्ह्यातही ही हालचाल वेगाने सुरू झाली आहे.
बैठकीस प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोर पाटील पोरेटी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा ऍड. कविता मोहरकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, तसेच सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला की, “मतदार यादीतील घोळांमुळे लोकशाही प्रक्रियेवर अन्याय होऊ देणार नाही. प्रत्येक मतदाराचे नाव आणि अधिकार सुरक्षित ठेवला जाईल.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













