– रेतीच्या ओव्हरलोड वाहतुकीने मंदिर जमीनदोस्त होण्याच्या मार्गांवर
The गडविश्व
चामोर्शी, दि. १७ : विदर्भाची कशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदी किनारी असलेल्या मार्कंडेश्वराचे मंदिर धोक्यात आले आहे. मार्कंडा येथून मोठ्या प्रमाणात रेतीची ओव्हरलोड वाहतूक केल्या जात आहे त्यामुळे जमीन कंपन पावत असून मंदिर जमीनदोस्त होण्याच्या मार्गांवर आले आहे. सदर धोक्याची घंटा लक्षात घेता या मार्गाने होणारी ओव्हरलोड वाहतूक रोखण्यात यावी अशी मागणी मार्कंडा वासियांनी केली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील रेती उच्च प्रतीची असल्याने या जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यात रेतीची वाहतूक केली जाते. अशातच चामोर्शी तालुक्यातील मोहुर्ली गावातील रेती घाटावरून रेतीची वाहतूक अनेक दिवसांपासून केल्या जात आहे. सदर रेती मोठ्या हायवा ट्रकद्वारे रामाळा, घारगांव,मोहुर्ली या गावातुन केली जात होती मात्र गावकऱ्यांनी त्यास विरोध करीत वाहतूक बंद पाडल्याने मार्कंडादेव मार्गे रेतीची वाहतूक सुरु केली. मोठ्या हायवा ट्रकने रेतीची वाहतूक होत होत असून दररोज शेकडो टन वाहतूक केल्या जात आहे. सदर मार्ग मार्कंडदेव मंदिरालगत असल्याने रेती वाहतुकीने जमीन कंपन पावून मार्कंडा देव मंदिर जमीनदोस्त होण्याच्या मार्गांवर आले आहे.
मार्कंडादेव येथे भाविक नेहमीच दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यामुळे या मार्गावर वर्दळ असते. तसेच गावातूनच हा मुख्य मार्ग असल्याने ट्रकच्या भीतीने येथील नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून प्रवास करीत आहे. या वाहतुकीने जीवित हानी होण्याची शक्यता नाकारल्या जाऊ शकत नाही. याबाबत स्थानिक नागरिकांनी तहसीलदार प्रशांत घरुडे, उपविभागीय अधिकारी अमीत रंजन यांना रेतीची ओव्हरलोड वाहतूक बंद करावी अशी मागणी केली होती मात्र अद्याप मार्कंडादेव येथून होणारी रेतीची ओव्हरलोड वाहतूक बंद झाली नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासन एखादी अनुचित घटना, मार्कंडादेव येथील मंदीर जमीनदोस्त होण्याची वाट पाहत आहे काय ? असा प्रश्न हि निर्माण होत आहे.
सदर मार्गाने होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मार्कंडेश्वराचे मंदिर जमीनदोस्त झाल्यास तालुका व जिल्हा प्रशासन संपूर्ण जबाबदार असेल असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
