मौशिखांबमध्ये महाश्रमदानातून स्वच्छतेचा जागर; रॅली, वृक्षारोपणासह विविध उपक्रम उत्साहात

1

मौशिखांबमध्ये महाश्रमदानातून स्वच्छतेचा जागर; रॅली, वृक्षारोपणासह विविध उपक्रम उत्साहात
The गडविश्व
ता. प्र/धानोरा, दि. ०४ : ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत गांधी जयंतीनिमित्त गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब ग्रामपंचायतीत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थ, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून महाश्रमदान करत गावातील रस्ते व सार्वजनिक परिसराची स्वच्छता करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर गावातून स्वच्छता रॅली काढण्यात आली. ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीनंतर ग्रामस्थांनी गाव स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवण्याची शपथ घेतली.

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत गावात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कचरा व्यवस्थापनासाठी कंपोस्ट खड्ड्यात कंपोस्ट भरण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपत गावातील दिव्यांग व्यक्तींना पिण्याच्या पाण्याच्या कॅनचे मोफत वाटपही करण्यात आले.
या उपक्रमासाठी जिल्हा परिषद गडचिरोलीचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर, सहाय्यक गट विकास अधिकारी एल. के. बेडके, विस्तार अधिकारी पंचायत तथा प्रशासक विनायक देव्हारे, जिल्हा अध्यक्ष ग्रामसेवक संघटना कवीश्वर बनपूरकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अमीत माणूसमारे आणि तालुका समन्वयक प्रदीप बरई यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत अधिकारी खुशाल नेवारे, माजी उपसरपंच रुपाली गंधरवार, माजी सदस्य जय कुमार खेडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानाजी काळबांधे, महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता हर्षे यांच्यासह मुख्याध्यापक आवारी, भुरसे सर व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका-मदतनीस आणि विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रामपंचायतीचे कर्मचारी, गंगाधर लटारे, मुरारी धोटे, भूषण गुरूंकर, रोजगार सेवक रवी, रोजगार हमी योजनेचे मेट विलास भैसारे, संगणक चालक सुरेश कोलते तसेच गावातील महिला-पुरुषांनी महाश्रमदानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here