नेलगुंड्यात पोलीस आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून उभारला पूल

15

नेलगुंड्यात पोलीस आणि ग्रामस्थांच्या श्रमदानातून उभारला पूल
– दुर्गम भागातील नागरिकांची पावसाळ्यातील गैरसोय दूर; विद्यार्थ्यांसह रुग्णांनाही मोठा दिलासा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने सामाजिक बांधिलकी जपत मोलाचे योगदान दिले आहे. नेलगुंडा गावाजवळील नाल्यामुळे पावसाळ्यात वारंवार खंडित होणारा संपर्क सुरळीत करण्यासाठी नेलगुंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी, एसआरपीएफचे जवान आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून पूल उभारला. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांची ये-जा सुलभ झाली असून, विद्यार्थ्यांसह वैद्यकीय मदतीची गरज असणाऱ्या रुग्णांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नाले आणि ओढ्यांना पाणी आल्याने गावांचा इतर भागांशी संपर्क तुटतो. नेलगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेलगुंडा गावाजवळील नाल्यामुळेही अशीच परिस्थिती निर्माण होत होती. पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहतुकीचा मार्ग बंद पडत असे. परिणामी, नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच, रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळविणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही कठीण होत होते.
या समस्येवर कायमस्वरूपी दिलासा देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑक्टोबर २०२६ रोजी अभियानादरम्यान योग्य बंदोबस्त ठेवून नेलगुंडा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार आणि एसआरपीएफच्या जवानांनी श्रमदानातून नवीन पूल उभारला. या कामात ग्रामस्थांनीही सहभाग घेतल्याने पोलीस आणि नागरिकांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण समोर आले आहे.
पूल उभारल्यामुळे नाल्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात गावाचा संपर्क टिकून राहण्यास, विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची गैरसोय टाळण्यास आणि आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना मदत मिळवून देण्यास या पुलाचा उपयोग होणार आहे.
गडचिरोली पोलीस दलाची भूमिका केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यापुरती मर्यादित नसून, दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचीही आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. पोलिसांनी प्रत्यक्ष श्रमदानातून केलेल्या या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलीस दलाबद्दल विश्वास आणि आपुलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.
हा उपक्रम अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. यामध्ये सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट कुंभार, नेलगुंडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजिंक्य इथापे, एसआरपीएफचे पोलीस उपनिरीक्षक मोराणकर तसेच पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here