रेती माफियांना प्रशासनाचे अभय?; जिल्हाधिकारी, पालकमंत्री व महसूल मंत्र्यांवर शिवसेनेचा गंभीर आरोप

83

रेती माफियांना प्रशासनाचे अभय?; जिल्हाधिकारी, पालकमंत्री व महसूल मंत्र्यांवर शिवसेनेचा गंभीर आरोप
– आठ दिवसांत अवैध उत्खनन बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : जिल्ह्यातील सर्व रेतीघाट ९ जून २०२६ पासून अधिकृतरीत्या बंद करण्यात आले असतानाही अवैध रेती उत्खनन, साठेबाजी आणि वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. या संपूर्ण प्रकारामागे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, महसूल मंत्री आणि रेती माफियांचे संगनमत असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना (उबाठा)चे जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांनी आज (२९ जून) पत्रकार परिषदेत केला.
पवन गेडाम यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यांत दोन निष्पाप व्यक्तींना जीव गमवावा लागला. कोंडाळा येथील सिनराई रेतीघाटावर नियमबाह्य पद्धतीने मोठ्या लोडरच्या सहाय्याने सुरू असलेल्या उत्खननादरम्यान एका मजुराचा मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केला. या घटनांमध्ये आर्थिक तडजोड करून प्रकरणे दडपण्याचा प्रयत्न झाला असून, पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या संशयास्पद भूमिकेमुळे शवविच्छेदन प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रशासन केवळ तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून जबाबदारी झटकत असल्याची टीका करत गेडाम यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि महसूल मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली. शहरातून ओव्हरलोड ट्रॅक्टर आणि टिप्परची वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचाही आरोप त्यांनी केला.
अवैध रेती उत्खननामुळे नदीपात्रांचे नैसर्गिक संतुलन बिघडत असून भूजल पातळी, पर्यावरण आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान होत असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी करदात्यांचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करून अवैध रेती उत्खनन व वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा)ने केली आहे. येत्या आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर लोकशक्तीच्या बळावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पवन गेडाम यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला डॉ. श्रीकांत बनसोडे, नंदू कुमरे, विलास ढोबरे, मनोज पोरटे, विलास ठाकरे, पप्पू शेख, गोविंदा ब्राह्मणवाडे, वैभव सातपुते, नैताम यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here