उद्यापासून कुरखेडा येथे ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेच्या वतीने बिजोत्सव कार्यक्रम

388

– जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद राहणार उपस्थित
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा (Kurkheda) १ डिसेंबर : आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा यांच्या वतीने २ व ३ डिसेंबर २०२२ ला किसान मंगल कार्यालय, कुरखेडा, येथे बिजोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमामध्ये पर्यावरणीय शेती आणि पारंपारिक बियाणे संवर्धन, नैसर्गिक संसाधने, हवामान बदल आणि आजीविका महिला विषयी दृष्टीकोन तसेच शेती संलग्न व्यवसाय पशुपालन दुग्धव्यवसाय, मासेमारी आदी विषयांवर चर्चा होत असून यात उत्कृष्ट काम केलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या विषयातील तज्ञ व्यक्ती आमंत्रित करण्यात आलेले आहेत. प्रमुख वक्ते वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली व प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोलीचे डॉ संदीप कऱ्हाडे; चेतना विकास संस्था वर्धाच्या शेतीविषय तज्ञ श्रीमती निरंजना मारू, जिल्हा पशुसंवर्धन विकास अधिकारी सुरेश कुंभारे, युवा प्रागतिक सेवा मंडळ, भंडारा अविल बोरकर, नागपूरच्या प्रयोगशील शेतकरी श्रीमती अश्विनी औरंगाबादकर, अमरावती शेतीतज्ञ वसंत फुटाणे, नागपूरचे प्रयोगशील शेतकरी अनंत भोयर, नागपूर च्या पर्यावरणीय शेतकरी श्रीमती प्राची माहुरकर आणि कीर्ती मंगरूळकर, उगम संस्था व महिला किसान अधिकार मंच, महाराष्ट्र छायाताई पडघम, कुरखेडा तालुका पशूसंवर्धन विकास अधिकारी डॉ. प्रसाद भामरे, फॉंऊडेशन फॉर इकॉनॉमिक ॲन्ड इकॉलॉजिकल डेवलपमेंट, अर्जुनी मोरगाव च्या श्रीमती शालू कोल्हे हे उपस्थित राहून शेतकऱ्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत.
आज जगात सगळीकडे हवामान बदलाचे स्वरूप दिसायला लागले आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, वादळ, गारपीटयामुळे शेती आणि जंगलयातून मिळणाऱ्या उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे. मागील दोन वर्ष पावसा अभावी दुष्काळ सदृश्यस्थिती असताना या वर्षी खूप जास्त पाऊस पडला आणि पिकांचे नुकसान झाले. तर दुसरी कडे मागील दोन दशकात पारंपारिक बियाणांच्या जागी जास्त उत्पादन मिळावे म्हणून हायब्रीड बियाणे तसेच रासायनिक खतांचा अमाप वापर वाढला. यातून किडींचा आणि रोगांचा वाढता प्रभाव यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असून यात अल्प-अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची आजीविका धोक्यात आली आहे. शेती मध्ये ही स्थिती असताना जंगल, पाणी आणि पशुधन तसेच दुग्ध जनावरे यावर आधारित उत्पादनावरही हवामान बदलाचा परिणाम दिसायला लागला आहे. अशा परिस्थितीत शाश्वत उपजीविका, नैसर्गिक संसाधन व पशुधनाचे शाश्वत व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. परंतु हवामान बदलाच्या या स्थितीला आपणही जबाबदार आहोत हे समजत असतांनाही चूक सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करीत नाही त्यामुळे परिस्थिती अजूनही खालावत आहे. याच स्थितीचा आढावा घेवून आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेने गडचिरोली आणि चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकऱ्या सोबत काम सुरू केले. त्यात हवामान बदलामुळे आजीविकेच्या स्त्रोतांवर होणाऱ्या परिणामांना सहन करतील अश्या शाश्वत पद्धतींचा अवलंब, अन्नसुरक्षा, पोषण तसेच पर्याप्त उत्पन्न या बिंदूंवर लक्ष दिले. यासाठी देशी व पारंपरिक बियाणांचे संवर्धन, जैविकऔषधे व खते, कीड व्यवस्थापन, माती व पाणी व्यवस्थापन, एकात्मिक व मिश्र शेतीपद्धती आदींना प्रोत्साहन देवून सोबतच शेतीला शाश्वत व उत्पनाच्या दृष्टीकोनातून शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आदीं व्यवसायांची जोड दिली गेली. शेतीतील शाश्वत पद्धती आणि विविध आजीविकेच्या स्त्रोत्रांचे अवलंबन या रणनीतीमुळे शेतकार्यांना फायदा होताना दिसतो आहे.
ही बाब लक्षात घेवून पारंपारिक बियाण्याचे महत्व कळावे आणि शेतकर्‍यांनी त्यांचे संवर्धन करावे तसेच आजच्या हवामान बदलाच्या काळात शाश्वतरित्या आजीविका सक्षम करावी हे समजून घेण्यासाठी आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था तसेच गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी समूह यांनी या बिजोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यात गावामध्ये उपजीविकेशी संबंधित सुरु असणाऱ्या काही नाविन्य पूर्ण प्रयत्नांचे प्रदर्शन ज्यात देशी बियाणे, जैविकखते व औषधी, पारंपरिक खाद्य, विषमुक्त अन्न, पर्यावरणीय शेती यावर माहिती देणारी प्रदर्शनी असणार आहे. तसेच शेतकरी ते ग्राहक थेट विषमुक्त अन्नधान्य व अन्नपदार्थ विक्री व्यवस्था, यासोबतच आपल्या देशात या विषयावर काम करणार्‍या तज्ञ व्यक्तीं आणि शासकीय अधिकारीयांचे मार्गदर्शन व शेतकरी संवाद, प्रगतीशील शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष अनुभव ऐकायला मिळतील व त्यात सर्वोत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
तरी संपूर्ण शेतकरी, शासकीय अधिकारी, शेती व पर्यावरण विषयावर काम करणारे व्यक्ती, समूह, संघटना यांनी या बिजोत्सव कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here