– आर्थिक मदत करून मदतीचा हात पुढे
The गडविश्व
अहेरी, दि. ०१ : येथील प्रभाग क्र. १२ मध्ये असलेल्या एका घराला अचानक आग लागून सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण घर जळून राख झाल्याची घटना शनिवार १ जून रोजी सकाळी १० वाजता घडली. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत विचारपूस करून मदतीचा हात पुढे करत नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत केली.
सदर घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सिंधू सत्यनारायण कटलावार ह्या आपल्या मुलासह अहेरी येथील प्रभाग क्रमांक १२ मध्ये राहतात. सिंधू या इतरांच्या घरी स्वयंपाक बनवून आपला संसार चालवितात तर मुलगा साई हा मजुरीकाम करतो. शनिवार १ जूनला सकाळी ९ वाजता नित्याप्रमाणे माय- लेक घर बंद करुन आपापल्या कामावर गेले असता इकडे त्यांच्या घराला आग लागली. या आगीने काही वेळेतच संपूर्ण घर कवेत घेतले. यात घरातील सिलिंडरचा स्फोट झाल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रुप धारण केले. या आगीत घरातील रोख ५० हजार रुपये, एक तोळे सोने, कुलर, टीव्ही, कपडे, भांडी व इतर दैनंदिन वस्तू जळून खाक झाल्या. दरम्यान परिसरातील नागरिकांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र ते निष्फळ ठरले. तर नगरपंचायतमधील अग्निशामक दल पोहाचतपर्यंत घराची अक्षरश: राख झाली होती.
या घटनेचे माहिती स्थानिक माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना माहिती होताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच त्या परिवाराला जीवनावश्यक वस्तूसाठी आर्थिक मदत केली. यावेळी त्यांच्या इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #aheri)