कोरचीत कृषी विभागाचे विशेष शिबिर; शेतकऱ्यांच्या अडचणींचे जागेवरच निराकरण
– महिला शेतकरी नोंदणी, फार्मर आयडीसह विविध योजनांबाबत मार्गदर्शन
The गडविश्व
ता.प्र/कोरची, दि. १४ : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ व विशेष मोहिमेअंतर्गत बुधवारी (१४ ऑक्टोबर) कोरची येथील हनुमान मंदिर, बाजार चौक परिसरात मार्गदर्शन स्टॉल व विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला परिसरातील शेतकरी आणि महिला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या सहकार्याने आणि तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले. यावेळी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासोबतच शेतकऱ्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
शिबिरात महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी, पीएम किसान योजनेसाठी बँक खात्याचे आधार संलग्नीकरण, भूमी अभिलेखातील नोंदी अद्ययावत करणे, केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत डिजिटल फार्मर आयडी तयार करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण आदी कामे करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे जागेवरच निराकरण करण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरासाठी सहाय्यक कृषी अधिकारी दीक्षा घटे, शिवानी पदा आणि अविनाश हुमणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील शेतकरी व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.













