आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे समायोजन करा; संघटनेची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
– गॅस वापरण्याची सक्ती करण्यासह साप्ताहिक व सार्वजनिक सुट्या लागू करण्याची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : आदिवासी आश्रमशाळांमध्ये कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे नियमानुसार समायोजन करावे, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अनुदानित आदिवासी आश्रमशाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या (ठाणे, शाखा गडचिरोली) वतीने प्रकल्प अधिकारी, गडचिरोली यांना निवेदन देण्यात आले.
आश्रमशाळांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे समायोजन रखडल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन नियमानुसार समायोजनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी संघटनेने केली.
याशिवाय, आश्रमशाळांमध्ये स्वयंपाकासाठी लाकडाऐवजी गॅसचा वापर करण्याची सक्ती करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे साप्ताहिक व सार्वजनिक सुट्या लागू कराव्यात. सुट्यांच्या दिवशी काम करण्याची सक्ती आणि कर्मचाऱ्यांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी सर्व मुख्याध्यापक व संस्थाध्यक्षांना स्पष्ट लेखी आदेश द्यावेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
संघटनेचे नागपूर विभाग अध्यक्ष जितेंद्र दोडके यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले. यावेळी प्रकल्प अध्यक्ष तेजस घुटके, उपाध्यक्ष हिम्मत गहाणे, प्रकल्प सदस्य हरेश धकाते, जी. गोरटेकर, ज्योतीताई कॅमेडावर यांच्यासह जपतलाई आश्रमशाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करताना प्रकल्प अधिकाऱ्यांनी येत्या काळात कर्मचाऱ्यांचे नियमानुसार समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, समायोजनासह इतर प्रलंबित मागण्यांवरही प्रशासनाने लवकर कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.













