अबब… गडचिरोतील मृतक लक्ष्मणाला दोनवेळा मिळाले जीवनदान ? संजीवनी देणारा तो कोण ?

2023

– जिल्हयातील या प्रकाराने सारेच चक्रावले
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : “मृतक लक्ष्मणाला दोनवेळा मिळाले जीवनदान, संजीवनी देणारा तो कोण ?” हा बातमीचा मथळा वाचून तुम्हीही चक्रावले असणार. नेमका हा प्रकार काय आहे ? मृतक व्यक्ती जिवंत होऊ शकतो काय ? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असेलच. मात्र असाच एक प्रकार गडचिरोली जिल्हयात घडला आहे. हा सर्व प्रकार तुम्हच्या लक्षात आल्यास तुमच्याही भोवया उंचावणार आहे हे मात्र नक्की.
गडचिरोली जिल्हयात काही दिवसांपूर्वी येथील नगर रचनाकार अर्चना पुट्टेवार यांना सासऱ्याची कट रचून हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आल्याने तेव्हापासून नगररचना विभागाशी निगडीत अनेक अवैध कामे उघकीस येत आहे. अशातच गडचिरोली जिल्हयातील अहेरी येथील अवैध ले-आउट प्रकरणी मोठी घडामोड पुढे आली आहे.
अहेरी नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या पुरग्रस्त भागात नगररचना विभागाने कोणतीही शहानिशा न करता ले-आउट पाडण्यास मंजुरी दिली. अर्चना पुट्टेवार यांचे प्रकरण घडताच अनेक ले-आउट अवैध असल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झाले आहे. दरम्यान अहेरी येथे भूमाफियांनी अवैधरित्या ले-आउट पाडून विक्री करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशा आदी मागण्यासाठी आमरण उपोषणाला २ जुलै पासून बसले आहे.
अहेरी येथील अवैध लेआउट प्रकरणात नगररचना विभागाने दिलेली मंजुरी तसेच सदर खासगी ले-आउटमध्ये शासकीय निधीचा वापर केल्याचे कळते. एवढेच न होता ले-आउट पाडण्यासाठी मृतक व्यक्तीला दोनवेळा जिवंत केल्याचाही प्रकार उघकीस आला आहे. आता या प्रकरणात मृतक व्यक्तीला जिवंत कसे केले असाही सवाल तुम्हाला पडला असेल त्याचे उत्तर खाली आहे.
लक्ष्मण उकुजी गुरनुले यांचा ४ एप्रिल २०११ रोजी अहेरी येथे मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आहे. दरम्यान लक्ष्मण यांच्या अहेरी येथील सर्वे क्र. २०७ या कृषी जागेची अकृषक करण्यासाठी पोटहिस्सा करणे आवश्यक होते. ते करण्यासाठी भूमाफियांनी मोठे फेरबदल करीत जागेची रजिस्ट्री करून घेण्याची मजल मारली आहे.
लक्ष्मण यांचा मृत्यु २०११ मध्ये झाला असतांना त्याच्या मालकीच्या जागेचा पोटहिस्सा करण्यासाठी लक्ष्मण २७ सप्टेंबर २०१३ रोजी जिवंत होत रजिस्ट्री करण्यास हजर झाला त्यानंतर पुन्हा दोन वर्षांनी हिस्साफार्मवर स्वाक्षरी करण्यास २३ एप्रिल २०१५ रोजी जिवंत होत लक्ष्मण यांनी स्वाक्षरी केल्याचे उघडकीस आले. हा सर्व प्रकार भूमाफियांनी जागा हस्तगत करून लेआउट पाडण्यासाठी केला असल्याचा आरोप अजय कंकडालवार यांनी केला आहे. सदर प्रकरण लक्षात येताच लक्ष्मण यांच्या पत्नी मंगला गुरनुले यांनी उपविभागीय दंडाधिकारी अहेरी यांना ५ सप्टेंबर २०२२ रोजी निवेदन देवून सर्वे क्र. २०७ च्या पोटहिस्सा कामे पती मय्यत असतांना खोटया स्वाक्षरी करून पोटहिस्सा करण्यात आल्याचे म्हटले आहे. तसेच लेआउट टाकुन विकण्यासाठी मृतकाचे नाव टाकून हिस्सा करण्यात आल्याचा आरोप करत पोटहिस्सा रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे. मात्र सदर निवेदनावर अदयाप कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
सदर लेआउट अकृषक करण्याकरिता कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली यांनी लक्ष्मण गुरनुले यांना ११ मे २०१५ रोजी पत्रव्यवहार केला तसेच याबाबत प्रतीलिपी उपविभागीय अधिकारी यांनाही पाठविण्याची नोंद आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय अहेरी यांनी नगररचना विभागास २० फेब्रुवारी २०१५ रोजी कृषक जमीन निवासी प्रयोजनाकरीता अकृषक उपयोगास आणण्याची परवानगी प्रदान करण्यासाठी पत्रव्यवहार केला. तसेच परवानगी प्रदान करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र १५ दिवसांच्या आत पाठवण्याचे पत्र कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली, उपअधिकक्ष अहेरी उपजिल्हा रूग्णालय, कार्यकारी अभियंता एमएसईडीसीएल आलापल्ली, उपविभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अहेरी, सरपंच, सचिव ग्रामपंचायत अहेरी यांनाही २० फेब्रुवारी २०१५ पत्र पाठविले. दरम्यान वर्ष उलटुनही नगर रचना विभागाने त्यासंदर्भात कोणताही अभिप्राय न दिल्याने उपविभागीय अधिकारी अहेरी यांनी पुन्हा २७ सप्टेंबर २०१६ रोजी पत्रव्यवहार करून अभिप्राय देण्याचे अवगत केले. तत्पुर्वी २ मार्च २०१३ रोजी उपअधिक्षक उपजिल्हा रूग्णालय अहेरी मार्फत मृतक लक्ष्मण गुरनुले यांनी कृषी जमीन निवास प्रयोजनार्थ अकृषक करण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचेही नोंद आहे. तहसिलदार अहेरी यांनीही सदर जमिन अकृषक परवानगी संबंधातील जाहिर सुचना कार्यालयीन नोटीस बोर्डावर लावून प्रसिध्द करण्यात आल्याचे उपविभागीय अधिकारी यांना २७ मार्च २०१५ रोजी पत्रव्यवहार केला.
सदर सर्व प्रकार लक्षात घेता मोठा घोळ भूमाफिायांनी केल्याचे दिसत असुन यात शासकीय कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याचे दिसुन येत आहे. मय्यत व्यक्तीच्या खोटया स्वाक्षरी करून लेआउट पाडण्याच्या प्रकरणाची तात्काळ योग्य सखोल चौकशी केल्यास अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान सदर प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करण्यात येवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी धरून अजय कंकडालवार हे आमरण उपोषाला बसले आहे.
मात्र “गडचिरोतील मृतक लक्ष्मणाला संजीवनी देऊन दोनवेळा जीवनदान देणारा तो कोण ? ” असा सवालही अद्यापही या प्रकरणातून खुणावत आहे हे मात्र नक्की. सखोल चौकशी झाल्यास संजीवनी देणारा पुढे येणार आहे हे तेवढेच खरे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #aheri leout )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here