कुरखेडा येथे बबलूभाई हुसैनी यांचा नागरी सत्कार
– वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा गौरव ; उपजिल्हा रुग्णालयात ड्रायफ्रूट वितरण
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०२ : कुरखेडा नगरपंचायतचे उपाध्यक्ष तसेच भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलूभाई हुसैनी यांचा वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम मंगळवारी सायंकाळी कुरखेडा येथे उत्साहात पार पडला.
ग्रामीण भागातून पुढे येत राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकौशल्याच्या बळावर बबलूभाई हुसैनी यांनी जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकारणापुरतेच स्वतःला मर्यादित न ठेवता त्यांनी सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. गरजू नागरिकांना मदत, विवाह कार्य, घरबांधणी, रुग्णांना आर्थिक सहकार्य, गोरगरीबांचा अंत्यविधी अशा विविध सामाजिक उपक्रमांत ते सातत्याने सक्रिय असतात.
गेल्या दहा वर्षांपासून भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी सक्षमपणे जबाबदारी पार पाडली आहे. तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक ते नगरपंचायत उपाध्यक्ष असा सलग पंधरा वर्षांचा त्यांचा राजकीय प्रवास उल्लेखनीय मानला जात आहे.
या कार्याची दखल घेत तसेच वाढदिवसाच्या औचित्याने भाजप व हुसैनी मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड्रायफ्रूटचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते कीशनभाऊ निरंकारी, माजी आमदार कृष्णा गजबे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













