गडचिरोलीतील नवेगाव ठरले जिल्ह्यातील पहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’
– १०५ घरांवर ४२४ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; गावाच्या विकासासाठी मिळणार एक कोटींचे अनुदान
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : केंद्र शासनाच्या पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत गडचिरोली तालुक्यातील नवेगावने जिल्ह्यात ऐतिहासिक कामगिरी नोंदविली आहे. गावातील १०५ वीज ग्राहकांनी घरांच्या छतांवर एकूण ४२४.२२ किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारल्याने नवेगावची जिल्ह्यातील पहिले ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या यशाबद्दल गावाला विकासकामांसाठी एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.
केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मॉडेल सोलर व्हिलेज विकसित करण्यासाठी विशेष स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अहेरी तालुक्यातील आलापल्ली व कुनघाडा, चामोर्शी तालुक्यातील आष्टी, गडचिरोली तालुक्यातील नवेगाव आणि वडसा तालुक्यातील कुरूड या पाच गावांचा समावेश होता. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या गावांची निवड केली होती. १७ सप्टेंबर २०२५ ते १६ मार्च २०२६ या कालावधीत ही स्पर्धा राबविण्यात आली.
या स्पर्धेत नवेगावमधील १०५ वीज ग्राहकांनी ४२४.२२ किलोवॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारून इतर गावांना मागे टाकले. सर्वाधिक सौर ऊर्जा निर्मिती क्षमता स्थापित केल्यामुळे समितीने नवेगावच्या नावावर जिल्ह्यातील पहिले मॉडेल सोलर व्हिलेज होण्याचा मान दिला.
सार्वजनिक इमारतींवरही सौर प्रकल्प
मॉडेल सोलर व्हिलेज म्हणून निवड झाल्यामुळे गावाला एक कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या निधीतून गावातील शासकीय व निमशासकीय इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्यानुसार १७ ठिकाणी एकूण १०६ किलोवॅट क्षमतेचे सौर प्रकल्प उभारण्यासाठी ६३.१२ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून त्याला मंजुरीही मिळाली आहे.
घरगुती सौर प्रकल्पांमुळे वीज खर्चात बचत आणि पारंपरिक वीजपुरवठ्यावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होत आहे. आता सार्वजनिक इमारतींवरही सौर प्रकल्प उभारले जाणार असल्याने गावात अक्षय ऊर्जेचा वापर अधिक व्यापक होणार आहे.
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि केंद्र शासनाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी यामुळे नवेगावने मिळविलेले हे यश जिल्ह्यातील अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













