कुरूड घाटात रात्रीच्या अंधारात रेतीची लूट? नदीपात्रात मुरूमचा रस्ता, महसूल यंत्रणा झोपेत?

5

कुरूड घाटात रात्रीच्या अंधारात रेतीची लूट? नदीपात्रात मुरूमचा रस्ता, महसूल यंत्रणा झोपेत?
– लोडर-पोकलँडच्या वापराची चर्चा; रात्री ट्रॅक्टरद्वारे रेती वाहतूक होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. १९ : देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील नदीघाटात रात्रीच्या अंधारात कथित रेती उत्खनन आणि वाहतुकीचा खेळ सुरू असल्याची चर्चा आहे. लोडरच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये रेती भरली जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून, वाहतुकीसाठी थेट नदीपात्रात मुरूम टाकून रस्ताच तयार करण्यात आल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, घाट परिसरात पोकलँड मशीनच्या ठशांचेही निदर्शनास आल्याची माहिती आहे. त्यामुळे मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रेतीचे उत्खनन केले जात आहे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टरची ये-जा सुरू असल्याची चर्चा असताना महसूल विभागाचे लक्ष या प्रकाराकडे का जात नाही, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
नदीपात्रात मुरूम टाकून रस्ता तयार करण्याची परवानगी कोणी दिली? या मार्गाचा वापर नेमका कोणत्या कारणासाठी केला जात आहे? लोडर आणि पोकलँडच्या वापरास अधिकृत परवानगी आहे काय? रात्रीच्या वेळी होणाऱ्या कथित रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची? असे अनेक प्रश्न या प्रकारामुळे उपस्थित होत आहेत.
अवैध रेती उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याबरोबरच नदीपात्राच्या नैसर्गिक रचनेला आणि पर्यावरणालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

दिवसा नव्हे, रात्रीही तपासणी करा!

कुरूड घाटातील प्रकाराची तहसील प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करावी. विशेषतः रात्रीच्या वेळी अचानक तपासणी करून उत्खनन, वाहतूक, वापरली जाणारी यंत्रसामग्री आणि नदीपात्रात तयार केलेल्या रस्त्याची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
रात्रीच्या अंधारात कथित रेती उपसा सुरू असल्याच्या चर्चेनंतरही महसूल प्रशासन अनभिज्ञ आहे की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. आता तहसील प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन प्रत्यक्ष कारवाई करणार की हा प्रकार असाच सुरू राहणार, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Kurud #Desaiganj #IllegalSandMining #SandSmuggling #RevenueDepartment #Maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here