धानोरा : ११ वर्षांपासून फरार अत्याचार प्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

2

धानोरा : ११ वर्षांपासून फरार अत्याचार प्रकरणातील आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
– नावातील तफावत आणि ओळख लपविण्याचा प्रयत्न निष्फळ; डोंगरहूड येथून धानोरा पोलिसांची कारवाई
The गडविश्व
ता. प्र. / धानोरा, दि. १८ : अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात तब्बल ११ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला धानोरा पोलिसांनी अखेर अटक केली. नावातील तफावत आणि ओळख लपविण्याचा प्रयत्न करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या महेंद्र ऊर्फ मुराजीजी दुग्गा (वय ३८, रा. परसवाडी/वानरचुवा, ता. आरमोरी) याला १७ नोव्हेंबर रोजी मालेवाडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील डोंगरहूड येथून ताब्यात घेण्यात आले.
२० ऑक्टोबर २०१५ रोजी अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपीच्या अत्याचारामुळे मुलगी गर्भवती राहिली होती. प्रसूतीदरम्यान मृत अर्भक जन्माला आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.
फरार आरोपींच्या शोधासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान धानोरा पोलिसांनी या जुन्या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केला. तपासात आरोपीच्या नावात तफावत आढळून आल्याने शैक्षणिक कागदपत्रे आणि मतदार ओळखपत्राच्या आधारे त्याची खरी ओळख निश्चित करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून त्याला डोंगरहूड येथून अटक करण्यात आली.
आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोकुल राज आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुयश सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास गवते, सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #Gadchiroli #Dhanora #PoliceAction #CrimeNews #POCSOCase #MaharashtraPolice #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here