रोहित पवारांचे आरोप म्हणजे प्रसिद्धीसाठीचा राजकीय स्टंट; गडचिरोली राष्ट्रवादीचा निषेध
– खोटे नॅरेटिव्ह पसरवणे थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू; जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि.१८ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनासारख्या संवेदनशील विषयाचे राजकीय भांडवल करून आमदार रोहित पवार हे स्वस्त प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) गडचिरोली जिल्हा शाखेने केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारवर करण्यात येणारे आरोप निराधार असून, जनतेची दिशाभूल करणारे खोटे नॅरेटिव्ह तात्काळ थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी दिला.
बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वासेकर यांनी रोहित पवारांच्या आरोपांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करत त्यांचा निषेध नोंदविला.
अजित पवार यांचे अपघाती निधन ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे. या घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी पक्षाची भूमिका आहे. यासाठी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीआयडी तसेच आवश्यकता भासल्यास सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सध्या सीआयडी, डीजीसीए आणि संबंधित केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे वासेकर यांनी सांगितले.
विमान कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांना पाठीशी घातले जात असल्याचा रोहित पवारांचा आरोपही त्यांनी फेटाळला. संबंधित विमान कंपनीची सेवा २०१३ पासून विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रशासनाकडून घेतली जात आहे. जुन्या छायाचित्रांच्या आधारे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या महत्त्वपूर्ण प्रसंगी माध्यमांचे लक्ष विचलित करण्यासाठीच रोहित पवारांनी हा प्रकार केल्याचा दावाही त्यांनी केला.
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना महायुती सरकार शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजारांवरून ३२ हजार रुपयांपर्यंत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, विरोधक विकासाच्या मुद्द्यांऐवजी माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निराधार आरोप करीत असल्याचे वासेकर म्हणाले.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्याच्या विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, विनाकारण आरोप करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला रवींद्र वासेकर यांच्यासह पापडकर, माजी नगराध्यक्ष प्रमोद वैद्य, कार्याध्यक्ष नंदू नरोटे, पिंकू बावणे आदी उपस्थित होते.













