अतिदुर्गम बिनागुंड्यात पोलिसांनी व ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला पूल

10

अतिदुर्गम बिनागुंड्यात पोलिसांनी व ग्रामस्थांनी श्रमदानातून उभारला पूल
सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-६० जवानांचाही सहभाग; नागरिकांची वाहतुकीची समस्या सुटणार
The गडविश्व
गडचिरोली, दि. २३ : पावसाळ्यात नाल्याला पाणी आल्याने संपर्क तुटणाऱ्या अतिदुर्गम बिनागुंडा परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गडचिरोली पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि सीआरपीएफ, एसआरपीएफ व सी-६० जवानांच्या सहभागातून श्रमदान करत बिनागुंडा गावाजवळील नाल्यावर ६० मीटर लांबीचा पूल उभारला. यामुळे परिसरातील नागरिकांची ये-जा सुलभ होण्यास मदत होणार आहे.
बिनागुंडा ते लाहेरी मार्गावर गावाजवळ असलेल्या नाल्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीचा मार्ग वारंवार बंद होत होता. परिणामी, नागरिकांचा इतर गावांशी संपर्क तुटत होता. तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळविण्यात अडचणी येत होत्या, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते.
नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑक्टोबर रोजी हा उपक्रम राबविण्यात आला. पोलीस मदत केंद्र बिनागुंडा येथील अधिकारी व अंमलदारांसह सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि सी-६० जवानांनी एक ट्रॅक्टर व जेसीबीच्या साहाय्याने आठ पाइप टाकून श्रमदानातून पुलाची उभारणी केली.
नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. यापूर्वी १३ सप्टेंबर रोजी नेलगुंडा येथेही पोलिसांनी नागरिकांच्या सहभागातून पूल उभारला होता. बिनागुंडा येथील या उपक्रमामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पोलीस दल केवळ सुरक्षाच नव्हे, तर दुर्गम भागातील विकासासाठीही प्रयत्नशील असल्याचे अधोरेखित झाले आहे.
हा उपक्रम अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. पोलीस मदत केंद्र बिनागुंडाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक तुकाराम नलवडे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, अंमलदार आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here