लॉयड्सच्या तीन तिरंदाजांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड; दोन सुवर्णांसह एका कांस्यपदकाची कमाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे आयोजित आंतरविद्यापीठीय तिरंदाजी स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई करत अकादमीच्या तीन तिरंदाजांनी ऑक्टोबर २०२६ मध्ये आसाम येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
इंडियन राउंड पुरुष गटात निखिल भोयर याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक जिंकले, तर आदित्य नाईगमकर याने तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदकावर नाव कोरले. महिला गटात दिया बॅनर्जी हिने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाची कमाई केली.
या यशाबद्दल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंची जिद्द, शिस्त आणि समर्पण तसेच प्रशिक्षकांचे परिश्रम यामुळे हे यश मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक तरुणांमधील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन देऊन त्यांना उच्चस्तरीय स्पर्धांसाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन (LIF) यांच्या पाठबळावर कार्यरत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी ग्रामीण व प्रादेशिक भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. तिरंदाजांच्या या यशामुळे गडचिरोलीच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळाली असून, आता हे तिन्ही खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत आपले कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.













